नवनियुक्त पदाधिकार्यांचा देवस्थान समिती कार्यालयात प्रवेश

 

कोल्हापूर :साडेतीन शक्तीपीठापैकी एक असलेल्या कोल्हापूर शहरातील श्री अंबाबाई देवीच्या देवस्थानासह पश्चिम महाराष्ट्रातील सुमारे ३०६७ मंदिरांचे व्यवस्थापन “पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती” मार्फत केले जाते. गेली ७ वर्षे देवस्थान समितीचे अध्यक्ष आणि कोशाध्यक्ष पद रिक्त असून, श्री अंबाबाई मंदिरासह या मंदिरांच्या व्यवस्थापनाकरिता असणाऱ्या देवस्थान समितीच्या अध्यक्ष पदी महेश जाधव आणि कोषाध्यक्ष पदी आमदार राजेश क्षीरसागर यांच्या पत्नी आणि भगिनी मंचच्या अध्यक्षा सौ. वैशाली राजेश क्षीरसागर यांची निवड करण्यात आली आहे.

आज सकाळी नूतन कोषाध्यक्षा सौ. वैशाली राजेश क्षीरसागर यांनी उभा मारुती चौक येथे दर्शन घेतले. यावेळी ढोल- ताशाच्या गजरात श्री अंबाबाई चा जयघोष करीत देवस्थान समितीच्या कार्यालयापर्यंत आमदार राजेश क्षीरसागर यांच्यासह शिवसेनेचे नगरसेवक, महिला आघाडी आणि प्रमुख पदाधिकारी रॅलीने आले. यावेळी देवस्थान समितीच्या कार्यालयाजवळ फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.

यानंतर नवनियुक्त अध्यक्ष महेश जाधव आणि कोषाध्यक्षा सौ.वैशाली राजेश क्षीरसागर यांनी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या कार्यालयात प्रवेश केला. यावेळी महापौर सौ.हसीना फरास, आमदार श्री. राजेश क्षीरसागर, जिल्हाधिकारी श्री. अविनाश सुभेदार, पालकमंत्री नाम.चंद्रकांतदादा पाटील यांच्या पत्नी सौ. अंजली पाटील, परिवहन सभापती नियाज खान, देवस्थान समितीचे सचिव श्री.विजय पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

                यावेळी बोलतना नूतन अध्यक्ष महेश जाधव यांनी, देवस्थान समितीच्या संचालंकाना विश्वासात घेऊन समितीचा कारभार पारदर्शी आणि स्वच्छ ठेवणार असून, झालेल्या निवडीचा ५ वर्षाचा कार्यकाल भ्रष्टाचारमुक्त पार पाडू अशी ग्वाही देत. देवस्थान समितीच्या अंतर्गत श्री अंबाबाई मंदिरासह सांगली, सिंधुदुर्ग पर्यंतची सुमारे तीनहजार मंदिरे येत असून, या देवस्थान समितीच्या माध्यमातून शिर्डी, सिद्धिविनायक देवस्थानच्या धर्तीवर  कोल्हापूर शहरातील नागरिकांना मुलभूत सोई-सुविधा उपलब्ध करून देणार आहे. देवस्थान समितीमध्ये गेल्या काही वर्षात झालेल्या घोटाळ्याबाबत आमदार श्री. राजेश क्षीरसागर यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीमुळे घोटाळ्याची एसआयटी चौकशी लागली असून, भ्रष्टाचार करणाऱ्यांना कडक शिक्षा मिळण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

यानंतर पत्रकारांशी बोलताना नवनियुक्त कोषाध्यक्षा सौ.वैशाली राजेश क्षीरसागर यांनी, उपस्थित सर्वांचे आभार मानले. शिवसेनाप्रमुख मा.बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि पालकमंत्री ना.चंद्रकांतदादा पाटील यांच्या आदेशाने  कोषाध्यक्ष पदी झालेली निवड श्री अंबाबाई ची निस्वार्थी सेवा करून, पारदर्शी कारभाराद्वारे देवस्थान समितिचा सदस्यांना विश्वासात घेऊन कारभार स्वच्छ ठेऊन सार्थकी लावणार असल्याचे सांगत. देवस्थान समितीच्या देणगीतून कोल्हापुचा सामाजिकपणा जपत सामाजिक कार्यांवर भर देत शहराचा विकास करण्याच्या दुष्टीने निस्वार्थी प्रयत्न करणार आहे. मागील काही वर्षात झालेल्या घोटाळाची निपक्षपाती चौकशी होऊन घोटाळेबाजाना कडक शासन होण्याकरिता प्रयत्न करणार आहे. यासह देवस्थान समिती मार्फत बाहेरून येणाऱ्या भक्तांनाही योग्य सोई-सुविधा देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!