
कोल्हापूर : जागतिक कीर्तीचे उद्योगपती मसालाकिंग डॉ. धनंजय दातार कोल्हापूरमध्ये येत असून उद्या (रविवार) सायंकाळी पाचला येथील उद्योजकांना मार्गदर्शन करणार आहेत. ‘सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट’च्या कोल्हापूर चॅप्टरतर्फे कसबा बावडा येथील महासैनिक दरबार हॉलमध्ये आयोजित केलेल्या उद्योगरत्न पुरस्कार सोहळ्याला डॉ. दातार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहाणार आहेत. त्यांच्या हस्ते ‘मेनन ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज’चे संस्थापक राम मेनन यांना ‘जीवनगौरव’ पुरस्काराने, तर ‘झंवर ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज’चे संस्थापक रामप्रताप झंवर यांना ‘कोल्हापूर उद्योगरत्न’ पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान श्रीमंत शाहू छत्रपती महाराज भूषवणार असून कोल्हापूरच्या महापौर हसिना फरास, तसेच शहरातील विवीध क्षेत्रांतील नामवंतांची प्रमुख उपस्थिती आहे. यानिमित्त डॉ. दातार ‘स्वकर्तृत्वातून यशस्वी वाटचाल’ ही आपली यशोगाथा उपस्थितांपुढे उलगडणार आहेत.डॉ. धनंजय दातार यांची यशोगाथा प्रेरणादायी आहे. गरीबी, संघर्षमय जीवन, उद्योजकीय वारसा आणि आर्थिक पाठबळाचा अभाव अशी पार्श्वभूमी असतानाही त्यांनी तरुण वयात व्यवसायाचे स्वप्न बघितले. मुंबईत दारोदार फिनेल विकताना त्यांनी विक्रीकला व ग्राहकसेवेचे कौशल्य मिळवले. वडिलांनी दुबईत थाटलेल्या छोट्याशा दुकानातून परिश्रमाने सुपर स्टोअर्सची साखळी निर्माण केली. आई-वडिलांचे संस्कार आणि कष्ट या जोरावर त्यांनी छोट्याशा व्यवसायातून जागतिक पातळीचा उद्योग समूह साकारला.वक्तशीरपणा, प्रामाणिकपणा आणि परिणामकारक सेवा या त्रिसूत्रीने ग्राहकांचे समाधान केल्यास व्यवसायात नक्कीच यश मिळते, यावर डॉ. दातारांचा भर आहे. याच प्रामाणिकपणाने गेली ३३ वर्षे व्यवसाय केल्याने त्यांना जागतिक स्तरावर अनेक प्रतिष्ठित पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. ‘फोर्ब्स मिडल ईस्ट’ने नुकताच ‘टॉप इंडियन लीडर्स इन द अरब वर्ल्ड २०१७ – रीटेल ॲवॉर्ड’ देऊन त्यांचा गौरव केला. डॉ. दातार हे ‘फोर्ब्स मिडल ईस्ट’च्या आघाडीच्या १०० भारतीय नेत्यांच्या मानांकन यादीतील बहुधा एकमेव महाराष्ट्रीय आहेत. अरेबियन बिझनेस रँकमध्ये त्यांना १४ वे, तर फोर्ब्जच्या यादीमध्ये ३३ वे मानांकन मिळाले आहे.‘अल अदील ट्रेडिंगने डॉ. धनंजय दातार यांच्या चैतन्यशील नेतृत्वाखाली ९००० भारतीय उत्पादने संयुक्त अरब अमिरातीत (युएई) आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. मसाले व पिठे तयार करुन पॅकबंद करण्यासाठी डॉ. दातार यांनी दुबई इन्व्हेस्टमेंट पार्कमध्ये दीड लाख चौरस फुटांचा भव्य व अत्याधुनिक प्रकल्प उभारला आहे. ‘अल अदील’ समूहाचे ३६ आऊटलेट्स, २ पिठाच्या गिरण्या व २ मसाल्याच्या गिरण्या असे जाळे आखाती देशांत विस्तारले असून मुंबई निर्यात विभागाची शाखा ‘मसाला किंग एक्स्पोर्ट्स (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड’ नावाने मुंबईत आहे.
Leave a Reply