
कोल्हापूर : गणेशोत्सवासाठी कोकणात आपल्या मूळ गावी फार मोठ्या संख्येने गणेशभक्त जात असतात. त्यांचा प्रवास सुखकार व्हावा यासाठी कोकणात जाणाऱ्या रस्त्यांची दुरुस्ती करण्यात येत आहे. या कामाची पाहणी करण्यासाठी आज कोल्हापूरपासून सुरु करुन कोल्हापूर, गारगोटी, उत्तूर, आजरा, आंबोली यामार्गे कोकणातून वैभववाडीपर्यंत पाहणी दौरा करण्यात येत आहे. पाऊस सुरु असल्याने स्थिती थोडीशी बिकट असली तरी गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी रस्ते दुरुस्तीच्या कामास सर्वोच्च प्राधान्य द्या, असे निर्देश सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले आहेत. गणेश उत्सवानंतर रस्त्यांच्या अनेक कामांची निविदा उघडण्यात येवून सर्व रस्त्यांची कामे सुरु होऊन दिवाळीपर्यंत सर्व रस्ते सुस्थितीत आणण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन, सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.
महाराष्ट्रात गणपती उत्सवापूर्वीच सर्व रस्ते सुस्थितीत व्हावेत, किमान खड्डेमुक्त व्हावेत यासाठी प्रयत्न सुरु आहेत. कोल्हापूरचा काही भाग आणि कोकणात पाऊस सुरु आहे. यावर मात करुन खड्डे भरणे प्राधान्याने सुरु आहे. या कामांची पाहणी आणि आवश्यक सूचना यासाठी सायन – पनवेल, पनवेल- इंदापूर, इंदापूर – खोपोली या रस्त्यांची पाहणी सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली आहे . आज कोल्हापूरातून कोकणात जाणाऱ्या रस्त्यांची पाहणी करुन यंत्रणेला ठिकठिकाणी निर्देश दिले. यावेळी त्यांच्यासोबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे (रस्ते) सचिव सी.पी.जोशी, राष्ट्रीय महामार्गाचे मुख्य अभियंता व्ही. एस. देशपांडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता सदाशिव साळुंखे, कार्यकारी अभियंता (दक्षिण) एन. एम. वेदपाठक यांची प्रमुख उपस्थिती होती.
मुंबईकर मोठ्या प्रमाणात गणपती उत्सवाच्या कालावधीसाठी कोकणात जातात. त्यांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. तसेच कोकणातील गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर रस्ते दुरुस्तीच्या कामास सर्वोच्च प्राधान्य देण्याचे निर्देशही यावेळी त्यांनी दिले. कोल्हापूर जिल्ह्यात कोल्हापूर – गारगोटी, गडहिंग्लज – नागनवाडी, चंदगड – भेडशी ते राज्य हद्दीपर्यंत राज्यमार्ग 189 या रस्त्यावर 65 कोटी रुपये खर्चुन रुंदीकरणासह सुधारणा करण्यात येत आहे. तसेच 15 छोट्या पुलांचे रुंदीकरण, पाईप मोऱ्यांचे रुंदीकरण, 27 पाईप मोऱ्यांची पुर्नबांधणी आदी कामेही करण्यात येत आहेत. बेलेवाडी घाटाची सुधारणा करण्यात येत आहे. तसेच कोल्हापूर – परिते – गारगोटी – गडहिंग्लज या मार्गावरही रुंदीकरणासह सुधारणा करण्यात येत आहे. या मार्गावर एका छोट्या पुलाचे रुंदीकरण, पाच पाईप मोऱ्यांची पुनर्बांधणी, 27 पाईप मोऱ्यांचे रुंदीकरण, 500 मीटर घाटातील संरक्षक भिंत, पालघाटाची सुधारणा आदी कामे करण्यात येणार आहेत.
Leave a Reply