
कोल्हापूर : राजर्षि छत्रपती शाहू प्रेरित पारंपारिक जंगली वृक्ष व जंगल पुनर्निर्माण अभियान या लोक सहभागातून होत असलेल्या सव्वा लाख वृक्ष लागवडीच्या अभियानामध्ये सहभागी होण्याचा हा क्षण आपल्यासाठीही आनंदाचा व अभिमानाचा आहे, असे सांगून या अभियानातून ग्रीन कोल्हापूर साकारले जाईल असा विश्वास, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार त्यांनी व्यक्त केला.
सकाळ माध्यम समूह, वन विभाग आणि जंगल पुननिर्माण अभियान यांच्यातर्फे सुरु करण्यात आलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील भुयेवाडी येथे राजर्षि छत्रपती शाहू प्रेरित पारंपारिक जंगली वृक्ष व जंगल पुनर्निर्माण अभियानाचे उदघाटन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याहस्ते झाले. आज याठिकाणी विविध प्रकारची जंगली वृक्षांची 1200 रोपे लावण्यात आली. याप्रसंगी महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, पुणे म्हाडाचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे, दै. सकाळचे मुख्य संपादक श्रीराम पवार, सामाजिक कार्यकर्ते निवास साळोखे, मुख्य वनसंरक्षक अरविंद पाटील, उपवनसरंक्षक डॉ. प्रभुनाथ शुक्ल, उपविभागीय अधिकारी सचिन इथापे, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, यांची प्रमुख उपस्थिती होती
वनमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, राजर्षि छत्रपती शाहू प्रेरित पारंपारिक जंगली वृक्ष व जंगल पुननिर्माण अभियान अंतर्गत सव्वा लाख जंगली वृक्ष रोपांची निर्मिती करण्यात आली आहे. सव्वा लाख वृक्ष लागवडीच्या अभियानाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात ऑक्सीजन निर्मिती होईल आणि प्रदुषण आणि पर्यावरणाचा ऱ्हास या समस्यांवर उपाय होईल. त्यामुळे या अभियानाला आपण मनापासून शुभ कामना देत आहे. या उपक्रमात वन विभाग संपूर्णपणे सहभागी असेल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. आपण सर्वांनी मिळून हा उपक्रम यशस्वी करु या आणि पिढ्यानपिढ्यांसाठी घनदाट जंगलांची निर्मिती करु या असे आवाहनही वनमंत्री मुनगंटीवार यांनी केले.
लोकसहभागातून एकाच ठिकाणी सव्वा लाख वृक्षारोपणाचा प्रयोग राज्यात प्रथमच कोल्हापुरातील भुयेवाडी येथे होत आहे. या अभियानामध्ये सकाळ माध्यम समूह, वन विभाग आणि जंगल पुननिर्माण अभियान सहभागी आहेत. त्यांच्यातर्फे चला झाडे लावूया, जंगल वाढवूया मोहिम हाती घेण्यात आली असून त्याला उत्स्फूर्त लोकसहभाग लाभत आहे. वृक्षारोपणासाठी विविध शाळांचे विद्यार्थी, पर्यावरण प्रेमी समाजिक कार्यकर्ते, विविध पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, अधिकारी पर्यावरणप्रेमी नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Leave a Reply