
कोल्हापूर : कोल्हापूरचा गुळ जगप्रसिध्द असून गुळ क्लस्टरच्या निर्मितीसाठी आवश्यक निधी उपलब्ध करुन देण्याबरोबरच कोल्हापूरचे प्रश्न सोडविण्यासाठी शासन पूर्णशक्तीनिशी कोल्हापूरच्या पाठीशी उभे राहील,अशी ग्वाही राज्याचे वित्त आणि नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज येथे बोलताना दिली.
मेक इन कोल्हापूर संकल्पनेंतर्गत महाराष्ट्र टाइम्सने सयाजी हॉटेल येथे आयोजित केलेल्या मटा कॉन्क्लेव कार्यक्रमात वित्त आणि नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार बोलत होते. या कार्यक्रमास राज्याचे महसूल तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे उपस्थित होते. कार्यक्रमास श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, खासदार धनंजय महाडिक, जिल्हा परिषद अध्यक्षा शौमिका महाडिक, आमदार चंद्रदिप नरके, आमदार संध्यादेवी कुपेकर, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, म्हाडाचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे, जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, पोलीस अधीक्षक संजय मोहिते, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमणार, महापालिका आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांच्यासह अनेक मान्यवर, पदाधिकारी, उद्योजक उपस्थित होते.
मेक इन कोल्हापूरसाठी उद्योजकांनी सक्रिय होवून पुढाकार घ्यावा, शासन खंबीरपणे पाठीशी राहील, अशी स्पष्ट ग्वाही देवून वित्त आणि नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, मेक इन महाराष्ट्रसाठी मेक इन कोल्हापूर बनविणे आवश्यक आहे. येथील औद्योगिक क्षेत्राला तसेच पर्यटनाला गती देण्यासाठी शासन आवश्यक त्या उपाययोजना करेल. महाराष्ट्राची देशात उत्पादनामध्ये मोठी आघाडी असून महाराष्ट्रात उद्योगाचे स्वत:च क्लस्टर निर्माण केले आहे. राज्यात जिल्ह्या – जिल्ह्यात असे उद्योग विकसित करुन नव्या पिढीला रोजगार उपलब्ध करुन देण्याबरोबरच औद्योगिक क्षेत्राचा झपाट्याने विकास करण्याचा ध्यास शासनाने घेतला असून महाराष्ट्र राज्य औद्योगिक क्षेत्रात अग्रेसर ठेवण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.
पर्यटन व्यवसायात रोजगार निर्मितीची मोठी क्षमता असल्याने राज्यात पर्यटनावर अधिक भर दिला जात आहे. कोल्हापुरच्या पर्यटन विकासासाठी शासन कटिबध्द असून यासाठीचे प्रस्ताव प्राधान्य क्रमाने मार्गी लावले जातील, अशी ग्वाही देवून वित्त आणि नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, मेक इन कोल्हापूर ही संकल्पना यशस्वी करण्याच्या दृष्टीने ज्या ज्या गोष्टी कराव्या लागतील त्या निश्चितपणे केल्या जातील. कोल्हापुरात जैव विविधता संशोधन केंद्राबाबतही सकारात्मक विचार केला जाईल. कोल्हापुरच्या गुळाला जागतीक बाजारपेठ मिळवून देण्याबरोबरच गुळासाठीचे क्लस्टर निर्माण करण्यासाठी आवश्यक लागणारा निधी उपलब्ध करुन दिला जाईल.
Leave a Reply