
कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरात १४ ते १७ सप्टेंबर या कालावधीत किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘नदी वाचवा, जीवन वाचवा’ या संकल्पनेवर आधारित हा महोत्सव राजर्षि शाहू स्मारक भवनमध्ये होणार असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष उदय गायकवाड यांनी आज (बुधवार) पत्रकार परिषदेत दिली.
ते म्हणाले की, कोल्हापुरातील या महोत्सवाचे आठवे वर्ष आहे. पर्यावरण विषयावरील आंतरराष्ट्रीय दर्जाचे ३५ पेक्षा अधिक चित्रपट या महोत्सवात प्रदर्शित केले जाणार आहेत. याचबरोबर पर्यावरण क्षेत्रात कार्य करणाऱ्या मान्यवर व कार्यकर्ते, संस्था यांना ‘वसुंधरा सन्मान’, ‘वसुंधरा मित्र’ व ‘वसुंधरा गौरव’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. ‘रिव्हर अँड आर्किटेक्चर’, ‘रिव्हर अँड लॉ’ या विषयावरील परिसंवाद, युवकांसाठी ‘शोध नदीचा’ या विषयावरील युवा संवादही आयोजित करण्यात आला आहे.
किर्लोस्कर ऑईल इंजिन उद्योग समूहासह पर्यावरण क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या संस्था व कार्यकर्ते संयोजक म्हणून काम करणार असल्याचे संयोजक समितीचे उपाध्यक्ष कृष्णा गावडे, राहुल पवार, राजेंद्र काकडे यांनी यावेळी सांगितले.
Leave a Reply