
कोल्हापूर: गणपती विसर्जन मिरवणुकीमध्ये कोणालाही डॉल्बी लावू दिला जाणार नाही. ध्वनी प्रदूषण नियंत्रण कायद्याची कठोर अंमलबजावणी केली जाईल, असे सांगून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळची गणेश विसर्जन मिरवणूक ऐतिहासिक, उत्साहात, सुरक्षित वातावरणात, शांततेत पण डॉल्बीमुक्तच होईल, असे निक्षून सांगितले.
शहरातील विविध मंडळांचे अध्यक्ष, प्रमुख यांना डॉल्बीमुक्त गणेश उत्सव व डॉल्बीमुक्त गणेश विसर्जन मिरवणूक याबाबत आवाहन करण्यासाठी पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी मार्गदर्शन करताना पालकमंत्री चंद्रकांत पाटील बोलत होते. यावेळी महापौर हसीना फरास, आमदार अमल महाडिक, कोल्हापूर परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, पोलीस अधीक्षक संजय मोहिते, अप्पर पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांची प्रमुख उपस्थिती होती.
या बैठकीत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंडळांना सुचित करताना सांगितले की, विसर्जन मिरवणूकीत कोणत्याही मंडळाने डॉल्बी लावायचा प्रयत्न केला तर प्रशासन त्याच्यावर कारवाई करण्यात हयगय करणार नाही. कठोर कारवाई करण्यामध्ये कोणतीही कमतरता ठेवली जाणार नाही. यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांना कायद्याचा अभ्यास करून केवळ डॉल्बी पुरविणाऱ्यांकरीता कलम 144 लावण्याचे निर्देशही दिले.
डॉल्बी उपकरणे पुरविणाऱ्यांना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आवाहन केले की, डॉल्बी मालकांनी पोलीस मुख्यालयाला डॉल्बीची उपकरणे जमा करावीत. ही उपकरणे जप्त केली नसल्याने त्यांना ती गणेश उत्सावानंतर परत केली जातील. या आवाहनाला जे प्रतिसाद देणार नाहीत, त्यांची डॉल्बीची उपकरणे जप्त केली जातील. त्यांना ती कोर्टातून सोडवून घ्यावी लागतील तसेच त्यांच्यावर गुन्हेही दाखल होतील, असेही त्यांनी सूचीत केले.
यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की, महाव्दारला मिरवणुकीतून येणाऱ्या प्रत्येक मंडळाची कसून तपासणी करण्यात येईल, ज्यांच्याकडे आक्षेपार्ह डॉल्बी उपकरणे सापडतील त्यांना मिरवणुकीमध्ये सहभागी होता येणार नाही. इतके सर्व करूनही जर कोणी डॉल्बी लावण्याचा प्रयत्न केला तर ध्वनी प्रदूषण कायदा अंतर्गत असलेली कलमे लावली जातील. यामध्ये 5 वर्ष सक्त मजुरीची शिक्षा असल्याचेही त्यांनी सांगितले. याबरोबरच डॉल्बी जॅमरबाबत करण्यात आलेल्या आवाहनाला प्रतिसाद मिळून असे उपकरण मिळाले आहे की, डॉल्बी सिस्टीममधील महत्वाचा भाग निकामी होईल की, ज्याची खरेदी पुणे-मुंबईशिवाय होऊ शकणार नाही असेही त्यांनी सांगितले.
पालकमंत्री पाटील यांनी तरूण, महिला, मुली, जेष्ठ नागरिक अशा सर्व अबालवृध्दांचा सहभाग असणारी ऐतिहासिक, अत्यंत उत्साहात, शांततेत, डॉल्बीमुक्त वातावरणात विसर्जन मिरवणूक आपण काढूया, असे आवाहन करून विसर्जन मिरवणूक उत्साहात काढण्यासाठी लागणारे सर्वतोपरी सहाय्य करण्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.
Leave a Reply