हिंदूंच्या धार्मिक सणांवरील निर्बंधांविरोधात शिवसेनेचा पोलिस महानिरीक्षक कार्यालयावर मोर्चा

 

कोल्हापूर : डॉल्बीचे समर्थन नाहीं पण प्रत्येक वेळी हिंदूंच्या पारंपरिक सणांबाबत दडपशाहीचे धोरण अवलंबणाऱ्या पोलीस प्रशासनाच्या विरोधात बुधवारी ३० ऑगस्टला पोलीस महानिरीक्षक कार्यालयावर मोर्चा काढणार असून पोलीस प्रशासनाला जाब विचारणार आहे अशी भूमिका शिवसेना जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केली.
जिल्ह्यात पोलीस प्रशासनाकडून हिंदूंच्या धार्मिक सणावर अनेक निर्बंध लादले जात आहेत. कायद्याचा, नियमांचा धाक दाखवून बैठकांमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना धमक्या दिल्या जात आहेत. गुन्हे दाखल करून तरुणांच्या जीवनाशी खेळण्याचा पोलीस प्रशासन नवीन खेळ करत आहे.समाजात तेढ निर्माण करण्याचे काम सुरु आहे, परंतु कोल्हापुरातील मटका, जुगार आदी अवैध व्यवसाय बंद होत नाहीत. खुनाचे आरोपी सापडत नाहीत. पैशाचे बक्षीस लावून खुन्याचा शोध पोलीस करत आहेत.महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी निर्भय पथकांची स्थापना करण्यात आली. पण ही पथक काय करतात याचाही शोध घेतला पाहिजे. जिल्ह्यात खाजगी सावकारकी जोरात सुरू आहे. यातूनच अनेक निष्पापांचे बळी गेले आहेत. त्याचबरोबर रात्रीच्या वेळी गस्त घालण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी आपली हौस पूर्ण करण्यासाठी महागड्या सायकली खरेदी केल्या. याचे उत्तर पोलीस प्रशासनाने द्यावे.असेही पवार म्हणाले. मशिदीवरील भोंगे यांचाही लोकांना त्रास होतोच,पण दहीहंडी,जोतिबा यात्रेतील सासन काठ्या यांची उंची याबाबत नेहमी कायदे का केले जातात असा सवाल जिल्हा प्रमुख विजय देवणे यांनी केला. मशिदीवरील भोंगे काढण्यासाठी बिंदू चौकात पहाटे पाचच्या सुमारास गणपतीची महाआरती करून विनंती करणार आहे तसेच शिवसेनेने नेहमीच पोलिस प्रशासनाला सहकार्य केले आहे पण आताची हुकूमशाही खपवून घेतली जाणार नाही.
हिंदू सणांवर कायद्याचा आधार घेऊन बंधने घालणार असाल तर आम्ही सडेतोड उत्तर देऊ असा इशाराही देण्यात आला.पत्रकार परिषदेस दुर्गेश लिंग्रस, शिवाजी जाधव, शिवसैनिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!