महाराष्ट्र फुटबॉल मिशन वन मिलियनचा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते शुभारंभ

 

कोल्हापूर : सतरा वर्षा खालील फिफा वर्ल्डकप स्पर्धेचे आयोजन 6 ते 24 ऑक्टोंबर 2017 या कालावधीमध्ये भारतात करण्यात आले आहे. या ऐतिहासिक स्पर्धेच्या निमित्ताने देशभर क्रिडा संस्कृती रुजविण्याच्या संकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या निमित्ताने 15 सप्टेंबर रोजी संपुर्ण महाराष्ट्रात महाराष्ट्र फुटबॉल मिशन वन मिलियन या उपक्रमांतर्गत 10 लाखाहून अधिक विद्यार्थी फुटबॉल खेळणार आहेत. कोल्हापूरचे फुटबॉल खेळाचे प्रेम पुर्वी पासूनच प्रसिध्द आहे. विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या निमित्ताने एक उत्साही वातावरण निर्माण व्हावे यासाठी साऱ्यांनी मिळून आज पुन्हा एकदा फुटबॉलमय होऊया आणि क्रिडा संस्कृती रुजवूया असे आवाहन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.
फिफा वर्ल्डकप स्पर्धेच्या निमित्ताने राज्यभरातील 30 हजार शाळांना प्रत्येकी 3 या प्रमाणे सुमारे लाखभर फुटबॉल वितरित करण्यात आले असून संपुर्ण राज्यात विविध पातळ्यांवर फुटबॉलचे सामने आज खेळले जाणार आहेत. अशा प्रकारचा महाराष्ट्र फुटबॉल मिशन वन मिलियन हा अभिनव उपक्रम राबविणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. कोल्हापुरात या उपक्रमाचा शुभारंभ महाराष्ट्र हायस्कुलच्या क्रिडागणांवर पालकमंत्री चंद्रकात पाटील यांनी फुटबॉलची किक मारुन केला. शालेय शिक्षण व क्रिडा विभागाअंतर्गत जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय, कोल्हापूर, कोल्हापूर स्पोटर्स डेव्हलपमेंट इनिशेटिव्ह, श्री प्रिंन्स शिवाजी मराठा बोर्डीग हाऊस यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र फुटबॉल मिशन वन मिलियन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी श्रीमंत छत्रपती शाहु महाराज, महापौर हसिना फरास, आमदार चंद्रदीप नरके, आमदार अमल महाडिक, जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, पोलीस अधिक्षक संजय मोहिते, मुख्य कार्यकारी अधिकारी कुणाल खेमणार, महानगरपालिका आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, जेष्ठ शिक्षण तज्ञ व प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिग हाऊसचे चेअरमन डी. बी. पाटील, जिल्हा क्रिडा अधिकारी माणिक वाघमारे, केएसडीआय व केएसबीपीचे अध्यक्ष सुजय पित्रे यांची प्रमुख उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!