
करवीरनिवासिनी श्री अंबाबाईला दसर्या दिवशी तिरूपतीहून आलेला शालू नेसवला जातो. मात्र, यावर्षीपासून देवस्थानच्या वतीनेच देण्यात येणारी साडी नेसवण्यात येईल, असे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी पत्रकार परिषदेत मंगळवारी सांगितले. शारदीय नवरात्रौत्सवाला गुरुवारी प्रारंभ होत असून, सांयकाळी मंदिरावर करण्यात आलेल्या ‘आर्किटेक्चरल इल्युमिनेशन’ या अद्ययावत एलईडी रोषणाईचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते व शाहू महाराज यांच्या अध्यक्षतेखाली होईल, असेही त्यांनी सांगितले.
जाधव म्हणाले, नवरात्रौत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे. घटस्थापना, त्र्यंबोली देवी भेटीचा सोहळा, नगरप्रदक्षिणा आणि दसरा या दिवसांसाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे. दसर्याच्या दिवशी मंदिरातील श्री अंबाबाई, श्री महाकाली व श्री महासरस्वती या तीनही देवींना केवळ पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडून दिल्या जाणार्या साड्याच नेसवल्या जातील. भाविकांसाठी दर्शन रांग, त्यात पाणी, लाईट व फॅनची सुविधा, मुखदर्शनाची स्वतंत्र व्यवस्था, गर्दीवर नियंत्रणांसाठी स्वयंसेवक, देवस्थानचे 51 सुरक्षारक्षक,
व्हाईट आर्मीचे 100 व जीवनज्योतचे 40 जवान,अनिरुद्ध मिशनचे 170 स्वयंसेवक कार्यरत राहणार आहेत.
मंदिराच्या चारही प्रवेशद्वारांवर डीएफएमडी, एचएमएमडी, वॉकीटॉकी यंत्रणा, सीसीटीव्हींचा वॉच राहील, असे सांगत जाधव म्हणाले, भाविकांसाठी मोबाईल टॉयलेटची सोय करण्यात आली आहे. कचरा उठावासाठी 19 कर्मचारी असतील, मंदिराबाहेरील आवारातील कचरा कोंडाळ्यातील कचरा प्रत्येक दोन तासांनी उचलला जाणार आहे. मंदिर आवारात प्रथमोपचार केंद्र असणार आहे. मंदिर परिसरात अॅस्टर आधार व व्हाईट आर्मी, मंदिराबाहेर अॅपल हॉस्पिटलचे उपचार केंद्र असेल.देवीला अन्य कोणत्याही देवस्थानकडून शालू किंवा साडी भेट आल्यास ती स्वीकारली जाईल; पण दसर्यादिवशी देवीला केवळ देवस्थान समितीकडून दिली जाणारी साडीच नेसवली जाणार असून यावर्षीपासून मंदिरात होणारा शालूच्या लिलावाची प्रथा बंद केल्याचे जाधव यांनी सांगितले. यावेळी कोषाध्यक्षा वैशाली क्षीरसागर, सदस्य शिवाजी जाधव, संगीता खाडे, प्रमोद पाटील, सचिव विजय पोवार, सहसचिव एस. एस. साळवी, अभियंता सुदेश देशपांडे, महालक्ष्मी भक्त मंडळाचे अध्यक्ष राजू मेवेकरी उपस्थित होते उत्सवाच्या काळात लहान मुले हरवणे, दागिने चोरीस जाणे यासारख्या घटना घडतात. त्यासाठी आपत्ती व्यवस्थापन कक्ष स्थापन करण्यात आला आहे. शेतकरी संघ येथे हा कक्ष कार्यरत असणार आहे. संपर्कासाठी पोलिस नियंत्रण कक्ष – 0231-2662333, शहर वाहतूक शाखा 0231-2641344, आपत्ती नियंत्रण कक्ष – 0231-2644544 या दूरध्वनी क्रमांकावरही संपर्क साधता येणार आहे.
Leave a Reply