जनमत सरकार विरोधात जातंय तेव्हा कामाला लागा – माजी कृषी मंत्री शरद पवार

 

कोल्हापूर: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नवीन प्रदेश कार्यालयात आज पक्षाची राज्यस्तरीय बैठक पार पडली. मागील निवडणुकांत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा ग्राफ खाली गेला हे मान्य करावे लागेल. पण आता चित्र बदलताना दिसत आहे. लोकांचे जनमत आताच्या सरकारविरोधात चालले आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी आता कामाला लागण्याची गरज आहे. लोकांचे प्रश्न सोडवण्यास हे सरकार अपयशी ठरले आहे. या सरकारविरोधात आपण एक संघर्ष उभा करायला हवा. आज राज्यासह देशभरात असंख्य प्रश्न आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रुड ऑईलचे दर अत्यंत कमी झाले आहेत पण देशात महागाईवर नियंत्रण करण्यास हे सरकार अपयशी ठरले आहे. या सरकारने इंधनावर अधिकचा कर लावला त्यामुळे संपूर्ण अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला. सामान्यांच्या दैनंदिन गोष्टींचा खर्च वाढला. याचा फटका कारखान्यांनाही बसला. सामान्य माणूस ग्रासला आहे. याविरोधात Nationalist Congress Party – NCP ने एक उठाव करायला हवा. काही जिल्ह्यात आंदोलनाला सुरुवात झाली पण ती परिस्थिती संपूर्ण राज्यात दिसून येत नाही.कर्जमाफीबाबत सरकारने लोकांची घोर फसवणूक केली. आता सरकार म्हणतंय की दिवाळीपर्यंत कर्जमाफी देऊ. दिवाळीपर्यंत तरी शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळते की नाही याबाबत शंका आहे. कर्जमाफीसाठी सरकारने ऑनलाईन अर्ज मागवले पण शेतकऱ्यांना तो अर्ज कसा भरायचा हेच कळत नव्हतं. अर्जाची रचनाही सरकारने किचकट केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रचंड अडचणींना सामोरे जावे लागत आहे. मुख्यमंत्र्यांनी जर सरसकट कर्जमाफी जाहीर केली असेल तर त्यात निकष नावाची भानगड कशाला? सरकारने सर्वांचे कर्जमाफ करायलाच हवे अशी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची भूमिका आहे.आज देशातले उद्योग बंद पडत आहेत. याचा फटका कामगार वर्गाला बसत आहे. माथाडी कामगार कामापासून वंचित होत आहे. ज्याप्रमाणे शेतकरी आत्महत्या करतात तेच पाऊल कामगार तर उचलणार नाही ना अशी भीती वाटत आहे. देशात खूप मोठी बेरोजगारी निर्माण होत आहे. अनेक बड्या कंपन्यांनी कामगारांना कमी केले आहे. आयटी क्षेत्रातल्या नोकरदारांना कामावरून कमी केले आहे त्यामुळे तिथेही अडचण होत आहे.महाराष्ट्र राज्यात सर्वात जास्त नागरी लोकसंख्या आहे. आपल्याला त्यांच्या प्रश्नांकडे लक्ष देण्याची गरज आहे. एल्फिन्स्टन स्थानकात जो अपघात झाला तो सरकारने योग्य पाऊले न उचलल्याने झाला. याआधी या सरकारसोबत रेल्वेप्रश्नी अनेक बैठका झाल्या पण सरकारने त्यावर काहीच केले नाही आणि निरपराध लोकांना आपला जीव गमवावा लागला. सामान्य माणूस जिथून प्रवास करतो त्याच्या यातना कमी करण्यासाठी सरकार प्रयत्न करत नाही. पण बुलेट ट्रेनचे प्रोजेक्ट आणले जातात. जपानमध्ये आज आर्थिक मंदी आहे. सर्वात फास्ट ट्रेन ही जपानमध्ये आहे. फास्ट ट्रेनची कारखानदारी जपानमध्ये आहे पण त्याला मार्केट नाही. जपानची आर्थिक मंदी कमी करण्यासाठी आपल्याकडे बुलेट ट्रेनचा प्रोजेक्ट करत आहेत. प्राधान्य कोणत्या प्रश्नांना द्यायचे हेच या सरकारला कळत नाही. लोकांच्या अपक्षेचा भंग झाला आहे. जिथे भाजपची सत्ता आहे तिथे लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र होऊ शकतात. त्या दृष्टीने कार्यकर्त्यांनी तयारीला लागावे.कार्यकर्त्यांनी सोशल मिडीयाचा वापर जपून करावा. सोशल मीडियावर अनेक खोट्या गोष्टीही पसरवल्या जातात. सोशल मीडियावर जे लोक सरकारविरोधात लिहितात त्यांना नोटीसा पाठवल्या जात आहेत. लोकशाहीत टीका करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. जे लोक आज सत्तेत आहेत ते विरोधात असताना टोकाची टीका करायचे. जे महत्त्वाचे निर्णय होते त्यांना यांनी विरोध केला होता. जीएसटी लागू केल्यानंतर आर्थिक संकट येऊ शकतं असं आक्रमक भाषण मोदींनी केलं होतं. या सगळ्या गोष्टींवर आपल्याला लक्ष ठेवायला हवं. ६ आणि ७ नोव्हेंबर रोजी कर्जत येथे पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली जाईल व त्यात पक्षाची रणनिती ठरवली जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!