
कोल्हापूर: सोशल मीडियाच्या माध्यमातून मानवता नसणारे विज्ञान, नैतिकता नसणारा व्यापार, तत्त्वं नसणारे राजकारण, चरित्रहीन शिक्षण त्याग असणारा धर्म फोफावत आहे म्हणून सोशल मीडियाच्या दुनियेत हरवलेल्या तरुणांना भारतीय संस्कृती शिकवण्याची गरज आहे . घराचे घरपण हरवून सिमेंटच्या जंगलात राहणाऱ्यांनी आपल्या वृद्ध आई बाबांना वृद्धाश्रमाचा रस्ता दाखवला आहे. या तरुणांना वृद्धांचा सन्मान केला पाहिजे ही गोष्ट शिकवण्याची गरज आज आहे असे प्रतिपादन विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी केले. कै . अनंत कोरगांवकर सामाजिक सेवा संघ ट्रस्ट आणि कोरगावकर पेट्रोल पंप यांच्यावतीने 1 ऑक्टोबर या ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला. निवृत्त कर्नल दिलीपसिंह थोरात हे अध्यक्षस्थानी होते. नांगरे पाटील म्हणाले आयुष्याची पुंजी जपून ठेवली तर वृद्धापकाळात उपयोगी येते. तुमच्या नावावर असलेला पैसा जमीन आपल्या वारसाच्या नावावर करण्याची घाई करु नका असे आवाहनही त्यांनी केले. कारण मुलं आई वडिलांना सांभाळत नाहीत म्हणून सरकारला कायदा करावा लागला ही खेदाची गोष्ट आहे. तरुणांनी वृद्धांच्या समस्या समजून घेऊन त्याचे निराकरण करण्याची गरज आहे .जी मुलं आई-वडिलांचा सांभाळ करणार नाहीत त्यांच्यावर कायद्याने गुन्हा नोंदवला जाईल असा इशाराही नांगरे – पाटील यांनी दिला. राज कोरगावकर यांनी प्रास्ताविक व आभार मानले. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी विवेक आगवणे, उद्योजक ट्रस्टचे संस्थापक अमोल कोरगावकर, अतुल कोरगावकर यांच्यासह अनेक ज्येष्ठ नागरिक व तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करण्यात आला.
Leave a Reply