
कोल्हापूर : मुंबईहून कोल्हापूरला येणाऱ्या महालक्ष्मी एक्स्प्रेसवर काल मध्यरात्री दीडच्या सुमारास दरोडा टाकला. प्रवाशांना धारदार शस्त्रांचा धाक दाखवून सोने, रोख रक्कम, मोबाईल असा लाखोंचा ऐवज लंपास केला. कोल्हापूर रेल्वे पोलिसात याबद्दल गुन्हा दाखल झाला आहे.
काल रात्री दीडच्या सुमारास चोरट्यांनी जेजुरी राजेवाडी स्थानकानजीकचा सिग्नल नादुरुस्त केला. त्यामुळे चालकाने रेल्वे थांबविली असता सुमारे दहा-पंधरा जण रेल्वेत घुसले. त्यांनी चहावाले आहोत असे भासवून नंतर प्रवाशांना शस्त्रांचा धाक दाखवीत त्यांच्याकडील पैसे, सोन्याचे दागिने, मोबाईल हँडसेट काढून घेतले. हा प्रकार सुमारे २५ मिनिटे सुरु होता. चोरट्यांनी रेल्वेच्या एस-२ ते एस १२ या डब्यातील प्रवाशांना लक्ष्य केले. लाखोंचा ऐवज लंपास करून चोरट्यांनी पोबारा केला. एरवी या गाडीत सुरक्षारक्षक तैनात केलेले असतात. मात्र काल या गाडीत कोणीच सुरक्षारक्षक नसल्याचा फायदा घेतल्याचे संतप्त प्रवाशांनी सांगितले. या प्रकाराने भयभीत झालेल्या प्रवाशांनी रात्र जागून काढली. विविध ठिकाणी उतरलेल्या प्रवाशांनी त्या त्या ठिकाणच्या पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
Leave a Reply