
कोल्हापूर : कोल्हापूरमध्ये करवीरनिवासिनी अंबाबाईच्या मंदिरातील पुजारी हटाव आंदोलन सुरू असतानाच आता मंदिरातले पुजारी आणि पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती यांच्यात सीसीटीव्हीवरून वाद उफाळला आहे. मंदिरातल्या मुख्य गाभाऱ्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीतर्फे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आलेत, पण हे कॅमेरे हटवा, अशी मागणी पुजाऱ्यांनी केली. मात्र कोणत्याही परिस्थितीत हे कॅमेरे हटविणार नाही, तसा प्रयत्न केल्यास तुमचे पूजेचे अधिकार काढून घेऊ, असा सज्जड इशारा देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी दिला.
मंदिरातल्या मुख्य गाभाऱ्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीतर्फे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आलेत. हे सीसीटीव्ही कॅमेरे त्वरित हटवावेत, अशी मागणी पुजाऱ्यांनी केली. तसेच गाभाऱ्यावर आमचा हक्क आहे. समितीला अशा पद्धतीने कॅमेरे बसविण्याचा अधिकार नाही. हे बेकायदेशीर कृत्य आहे, असा आरोपही केला. दुसऱ्या बाजूला गाभाऱ्यातील सीसीटीव्ही कॅमेरे पुजाऱ्यांनी बंदही पडल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी तातडीने पुजाऱ्यांची बैठक बोलावली.
या बैठकीत पुजारी कॅमेरे हटवण्याबाबत आक्रमक झाले होते. मात्र देवस्थान समितीनेही आक्रमक भूमिका घेत कॅमेरे तसेच राहतील ही भूमिका घेतली. कॅमेरे बंद केल्यामुळे सरकारी कामात अडथळा आणला म्हणून पुजाऱ्यांवर गुन्हा दाखल करणार असल्याचा इशारा महेश जाधव यांनी दिली. त्याचप्रमाणे पुजारी आपल्या म्हणण्यावर जर ठाम राहिले तर प्रसंगी देवीच्या पूजेचे सगळे अधिकार देवस्थान समितीकडे राखून ठेवून देवस्थान समिती पूजाअर्चा करेल असा इशाराही बैठकीत देण्यात आला.
Leave a Reply