रिलायन्स’च्या संशोधकांची शिवाजी विद्यापीठास भेट

 

कोल्हापूर : शैक्षणिक क्षेत्रातील संशोधनाचे औद्योगिक उपयोजन झाल्यानंतरच खऱ्या अर्थाने या देशात विकास प्रवर्तनास सुरवात होईल, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांनी आज येथे केले.

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या रिलायन्स टेक्नॉलॉजी ग्रुपच्या संशोधन व विकास केंद्राच्या शास्त्रज्ञांनी आज शिवाजी विद्यापीठास भेट देऊन येथे उपलब्ध असलेल्या संशोधकीय सुविधांची पाहणी केली. या संशोधक टीमशी संवाद साधताना डॉ. शिर्के बोलत होते.

डॉ. शिर्के म्हणाले, शिवाजी विद्यापीठाच्या सर्वच विज्ञान शाखांत आधुनिक विज्ञान व तंत्रज्ञानविषयक संशोधन सुरू आहे. या संशोधन कार्याला युजीसी, डीएई यांसारख्या देशातल्या प्रथितयश वित्तीय संस्थांकडून आर्थिक पाठबळ लाभले आहे. तथापि, या संशोधनाचा खऱ्या अर्थाने समाजाला लाभ होण्यासाठी विद्यापीठे, वित्तीय संस्था यांच्या बरोबरीने उद्योग क्षेत्र असा त्रिकोण विकसित होण्याची नितांत गरज आहे. रिलायन्स उद्योग समूहाचे संशोधन व विकास केंद्र ज्या प्रकल्पांवर काम करीत आहे, त्यातील बहुतेक क्षेत्रांमध्ये शिवाजी विद्यापीठात संशोधन कार्य सुरू आहे. त्यामुळे भविष्यात शिवाजी विद्यापीठ आणि रिलायन्स उद्योग समूह यांच्यातील संशोधन साहचर्य अधिकाधिक विकसित होत जाण्याच्या दृष्टीने या टीमची आजची भेट अत्यंत महत्त्वाची ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी रिलायन्स टेक्नॉलॉजी ग्रुपचे वरिष्ठ उपाध्यक्ष डॉ. संजीव कट्टी यांनी रिलायन्स उद्योग समूहाबरोबरच तेथील संशोधन व विकास केंद्राच्या वाटचालीविषयी सादरीकरण केले. ते म्हणाले, सर्वसामान्य व्यक्ती डोळ्यांसमोर ठेवून रिलायन्स उद्योग समूहामध्ये संशोधनाचे कार्य चालते. त्यामुळे समूह आज पेट्रोकेमिकल्स, वस्त्रोद्योग, दूरसंचार आदी अनेक क्षेत्रांत जागतिक स्तरावर अग्रगण्य कामगिरी बजावत आहे. नवसंशोधन आणि नवनिर्मिती या बळावर देशातील युवकांना आयपी युजर नव्हे, तर आयपी क्रिएटर म्हणून जागतिक ओळख प्रदान करण्यासाठी समूह प्रयत्नरत आहे. हे संशोधन कार्य अधिक मजबूतरित्या व संघटितपणे चालावे, यासाठी प्रायोजित संशोधन प्रकल्प व सह-संशोधन विकास प्रकल्प राबविण्यावर समूहाने भर देण्याचे ठरविले असल्याचेही त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!