डी.बी.एफ.एल.टी प्रकल्पा अंतर्गतलवकरच मध्यवर्ती बस स्थानकाचे रूप पालटणार   

 

कोल्हापूर  : कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानक, कोल्हापूर या आगाराची स्थापना १९५५ साली झाली असून, सुमारे ८ एकर ७ गुंठे जागेत आगार व बसस्थानक वसलेले आहे. या बसस्थानकावरून दैनंदिन सुमारे १५०० बसेसचे आगमन व निर्गमन होते. त्यातून अंदाजे दैनंदिन एक लाख प्रवासी प्रवास करतात. गेल्या काही वर्षापासून वाढलेली प्रवाशांची संख्या आणि याबदल्यात प्रवाशांना मिळणाऱ्या सोई सुविधा अत्यंत अपुऱ्या पडत असल्याचे दिसून येत होते. महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाने राज्यातील १३ बस स्थानकांचा विकास करून बसपोर्ट उभारण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानकाचा समावेश व्हावा, अशी मागणी कोल्हापूर शहराचा लोकप्रतिनिधी या नात्याने परिवहन मंत्री नाम. दिवाकर रावते यांच्याकडे केली होती. त्यानुसार कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानकाचा समावेश करण्यात आला आहे. कोल्हापूर शहरास सुमारे ३२५ कोटींचा प्रकल्प परिवहन मंत्री नाम.श्री. दिवाकर रावते यांनी मंजूर केला असल्याची माहिती, आमदार राजेश क्षीरसागर यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

                यावेळी माहिती देताना आमदार राजेश क्षीरसागर यांनी, कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानकात उपलब्ध असलेले फलाट अत्यंत कमी आहेत. जिल्ह्यांनजीक असणाऱ्या देवस्थानांच्या यात्रा, लग्नसराई, आठवडा सुट्टीचे वार, सण, पर्यटन आदिकरिता जादा वाहतूक करावी लागते, याकरिता  दि.१०.०२.२०१६ रोजी कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानकाचे पुनर्बांधणी करून बसस्थानक अद्ययावत करण्याची तसेच मध्यवर्ती बसस्थानकास पुरेशी जागा उपलब्ध होण्यासाठी मध्यवर्ती बस स्थानकालगत असेलेले आगार हे ताराबाई पार्क येथील जागेत स्थलांतरीत करून त्या जागेत असणारी विभागीय कार्यशाळा गोकुळ शिरगांव औद्यागिक वसाहत येथील परिवहन विभागाच्या जागेत स्थलांतरीत करण्याबाबत मागणी परिवहन मंत्री नामदार दिवाकरजी रावते यांच्याकडे केली होती.

                या पार्श्वभूमीवर राज्याचे परिवहन मंत्री नामदार दिवाकरजी रावते यांनी महाराष्ट्र राज्यात पहिल्यांदा दहा बस पोर्ट करण्याच्या प्रकल्पास मंजुरी दिली, परंतु यामध्ये कोल्हापूरचा समावेश नसल्याने आपण मा. परिवहन मंत्री महोदयांकडे कोल्हापूरचा यात समावेश करण्याकरिता सातत्याने पाठपुरावा केला. यानंतर परिवहन मंत्री नामदार दिवाकरजी रावते यांनी कोल्हापुरातील संभाजीनगर बस स्थानकाचे नाव समावेश करून त्याठिकाणी बस पोर्टला परवानगी दिली. परंतु ग्रामीण भागासह राज्यभरातून येणाऱ्या प्रवाशांची गर्दी ही मध्यवर्ती बस स्थानकावर जास्त असल्याने आपण पुन्हा परिवहन मंत्री नामदार दिवाकरजी रावते यांची भेट घेऊन संभाजीनगर आगार ऐवजी मध्यवर्ती बस स्थानक बस पोर्ट म्हणून विकसित करावे, अशी मागणी केली. ही मागणी रास्त असल्याने परिवहन मंत्री नामदार दिवाकरजी रावते यांनी कोल्हापूर मध्यवर्ती बस स्थानकास बस पोर्ट म्हणून विकसित करण्याकरिता मंजुरी दिली असून, याकरिता सुमारे ३२५ कोटी रुपयांचा प्रकल्प मंजूर केला आहे, यासंदर्भातील पत्र विभाग नियंत्रक परिवहन विभाग, कोल्हापूर याना त्यांनी पाठवले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!