
कोल्हापूर : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथे येत्या २६ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या १९व्या आंतरराज्य आंतरविद्यापीठ राज्य क्रीडा महोत्सवासाठी शिवाजी विद्यापीठाचा सुमारे १२० जणांचा संघ रवाना झाला. यात ११ व्यवस्थापक व प्रशिक्षकांचा समावेश आहे.
२६ नोव्हेंबर ते १ डिसेंबर २०१५ या कालावधीत होणाऱ्या राज्य क्रीडा महोत्सवात कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल आणि मैदानी स्पर्धेत सहभागी होण्यासाठी निघालेल्या या संघाला आज शिवाजी विद्यापीठाचे बी.सी.यू.डी. संचालक प्राचार्य डॉ. डी.आर. मोरे, प्रभारी कुलसचिव डॉ.व्ही.एन.शिंदे, परीक्षा नियंत्रक डॉ.महेश काकडे, प्रभारी वित्त व लेखाधिकारी अजित चौगुले यांनी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी क्रीडा अधिविभागप्रमुख प्रा.पी.टी.गायकवाड उपस्थित होते.
यापूर्वी झालेल्या १८ राज्य क्रीडा महोत्सवांत शिवाजी विद्यापीठाने तीन वेळा सर्वसाधारण विजेतेपद, सात वेळा उपविजेतेपद तर आठ वेळा तृतीय क्रमांकाचे सर्वसाधारण विजेतेपद पटकावले आहे. विद्यापीठाच्या सर्व संघांचे एकत्रित सराव शिबीर दि. १४ ते २४ नोव्हेंबर, २०१५ या कालावधीत विद्यापीठात पार पडले. विद्यापीठाचा संघ या वर्षीही आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करून स्पर्धेवर वर्चस्व मिळवील, असा विश्वास क्रीडा विभागप्रमुख पी.टी. गायकवाड यांनी व्यक्त केला.
या संघासोबत राष्ट्रीय कबड्डी मार्गदर्शक प्रा.शांताराम माळी (कबड्डी-महिला), राष्ट्रीय कबड्डीपटू प्रा. देवेंद्र बिरनाळे (कबड्डी-पुरुष), प्रा.जहांगीर तांबोळी (खोखो-पुरुष) प्रा.कांचन बेलाद (खोखो-महिला), प्रा. स्वप्निल पाटील (व्हॉलीबॉल-पुरुष), प्रा.राहुल इंगळे (व्हॉलीबॉल-महिला), प्रा. एन.डी.पाटील (बास्केटबॉल-पुरुष), प्रा. आकाश बनसोडे (बास्केटबॉल-महिला), प्रा.आर.टी.पाटील, प्रा.डॉ. नयना अलझापूरकर, प्रा.डॉ. सविता भोसले हे राष्ट्रीय स्तरावरील पदक विजेते व्यवस्थापक व प्रशिक्षक रवाना होत आहेत.
Leave a Reply