गेल्या तीन वर्षात पोलीस दल अधिक सक्षम आणि अद्ययावत करण्यावर भर:महसूलमंत्री चंद्रकांत पाटील

 

कोल्हापूर : राज्याचे पोलीस दल अधिक सक्षम आणि अद्ययावत करण्याबरोबरच पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्यासही राज्य शासनाने गेल्या तीन वर्षात सर्वाधिक भर दिला असल्याचे महाराष्ट्राचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे सांगितले.
स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या सभागृहात निवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचारी कल्याणकारी असोसिएशनच्या मेळाव्याचे उदघाटन महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते दिपप्रज्वलनाने करण्यात आले त्याप्रसंगी आयोजित समारंभात ते बोलत होते. या मेळाव्यास प्रमुख पाहुणे म्हणून खासदार संभाजीराजे छत्रपती हे उपस्थित होते. या समारंभास स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे अभयकुमार साळुंखे, असोसिएशनचे राज्य अध्यक्ष निवृत्त पोलीस उप महासंचालक डी.एन.जाधव, कार्याध्यक्ष तथा निवृत्त अप्पर पोलीस महासंचालक खंडेराव शिंदे, असोसिएशनचे अन्य पदाधिकारी रामराव वाघ, गुलाबराव पोळ, पी.टी.लोहार, सिताराम न्यायनिर्गुने, सुखानंद सापते आदी मान्यवर उपस्थित होते.
पोलीस हा समाज व्यवस्थेतील महत्वाचा घटक असल्याचे सांगून महसूलमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, पोलीस दलासाठी आवश्यक पायभुत सेवा सुविधा आणि साधन सामुग्री उपलब्ध करुन देण्याबरोबरच पोलीसांचे प्रश्न प्राधान्याने सोडविण्यास मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्राधान्य दिले आहे. कोल्हापूर पोलीस वसाहतीतील पोलीसांच्या घरांच्या दुरुस्तीसाठी गेल्या वर्षी 10 कोटीचा निधी मंजूर करुन ही घरे अद्ययावत करण्यात आली आहेत. तसेच पोलीसांच्या मुला-मुलींसाठी स्पर्धा परीक्षा केंद्र कार्यान्वित केले आहे.
निवृत्त पेालीस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या रास्त मागण्यांच्या सोडवणुकीसाठी लवकरच असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची मा. मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक घेवून निश्चितपणे मार्ग काढला जाईल, अशी ग्वाही महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी दिली. निवृत्त पोलीसांचे घर आणि आरोग्याचा प्रश्न महत्वचा असून निवृत्त पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य विमा ही योजना राबविण्याबाबत काय उपाययोजना करता येतील याबाबत पाठपुरावा करु असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!