येत्या २४ नोव्हेंबरला ‘हॅपी बर्थ डे’!

 
येत्या २४ नोव्हेंबरला कोणाचा वाढदिवस नाही परंतु ‘हॅपी बर्थ डे’ चित्रपट प्रदर्शित होणार असल्यामुळे त्याचा वाढदिवस आहे असं म्हणायला जागा आहे. हल्ली सहसा कुणीच ‘वाढदिवस’ साजरा करताना दिसत नाही. प्रत्येकजण ‘बर्थ डे’ साजरा करताना दिसतोय. कुणी ‘जगायचं एक वर्ष कमी झालं म्हणून’ तर कुणी ‘अजून एक वर्ष जगलो म्हणून’ ‘बर्थ डे’ साजरा करतो. ज्यांचं इंग्रजी कच्चं असतं ते ‘आज माझा ‘हॅपी बर्थ डे’ आहे म्हणत वाढदिवस साजरा करताना आढळतात. परंतु जर का तुम्हाला समजले की पुढच्या वर्षी तुम्ही तुमचा बर्थ डे साजरा करू शकाल की नाही याची गॅरंटी नाही तर तुमची काय रिऍक्शन असेल ?
‘थॅलॅसेमिआ’ हा रक्ताच्या कर्करोगाचा एक प्रकार आहे जो अनुवांशिकतेने लहान मुलांना होतो. साधारण जन्माच्या तिसऱ्या महिन्यापासून या रोगाची लक्षणं दिसू लागतात. शरीरातील ‘हिमोग्लोबिन’ निर्माण करण्याच्या प्रक्रियेत गडबडी निर्माण झाली की रक्तक्षीणता जाणवू लागते. शरीरातील रक्ताच्या कमतरतेमुळे बाहेरून रक्तपुरवठा करावा लागतो. हे शारीरिक, मानसिक आणि सांपत्तिक दृष्ट्या त्रासदायक असून वाईट गोष्ट म्हणजे या आजारावर अजूनतरी इलाज सापडलेला नाही. अश्याच असाध्य रोगाने पीडित असलेल्या एका तरुण मुलाची गोष्ट सांगणार आहे एक चित्रपट ज्याचं नाव आहे ‘हॅपी बर्थ डे’ !
या चित्रपटाची कथा आहे एका टिनेजरची. मध्यम वर्गीय कुटुंबातील एका षोडशवर्षीय मुलाची, जय ची, जो थॅलॅसेमिआ या कधीही बरा न होणाऱ्या रोगाने आजारी आहे. पण त्याला याची कल्पना नाही. आई वडील बहीण आणि तो अशा चौकोनी कुटुंबात राहणारा जय लहानपणापासूनच अत्यंत खोडकर तरीही सर्वांचा लाडका. थॅलॅसेमिआ ने पंडित असल्यामुळे जगण्यासाठी दर पंधरवड्याला त्याला रक्त द्यावं लागत असतं तरीही त्याचं पुढचं आयुष्य किती हे डॉक्टर्ससुद्धा ठामपणे सांगू शकत नसतात. त्यालाही आश्चर्य वाटत राहायचं आणि प्रश्नही पडायचा की घरचे त्याला मैदानी खेळ खेळायला का पाठवत नाहीत किंवा पावसात मनसोक्त भिजायला का देत नाहीत ? त्याच्या सोळाव्या वाढदिवशी त्याला अचानकपणे त्याच्या आजाराबद्दल कळते आणि हे ही समजते की तो सतराव्या वाढदिवसाला या जगात असेल की नाही याची शाश्वती नाही. ह्या सर्वांच्या अनुषंगाने पुढे काय काय घडते ते ‘हॅपी बर्थ डे’ चित्रपटातून मांडण्यात आले आहे.
मुकुलिना चित्र आणि रेड स्मिथ प्रॉडक्शनच्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती केली आहे दिलीप कोलते यांनी आणि सहनिर्माती आहे सायरा सय्यद.  थॅलॅसेमिआ आजाराने ग्रस्त एका षोडशवर्षीय मुलाची ही कथा असून याचं दिग्दर्शन केलंय नारायण गोंडाळ यांनी. चित्रपटात ‘रिंगण’ फेम शशांक शेंडे व ‘श्वास’ फेम अरुण नलावडे महत्वपूर्ण भूमिकांत आहेत. निमेश किजबिले, अमरदीप ठोंबरे, सेजल घरत, शुभम नारिंगीकर, ओजस ठोंबरे, आर्या केळशीकर, गौरांगी शेवडे, अमित पाटील, मनाली ठोंबरे आणि मयुरी फडतरे यांचादेखील या चित्रपटात भूमिका आहेत.
या चित्रपटाचे संगीत विक्रांत वार्डे यांनी केलं असून गीतकार मनीष अन्सुरकर आणि विक्रांत वार्डे यांच्या शब्दरचनांना रोहित राऊतआनंदी जोशी (तू येताना सामोरी) आणि जावेद अली (दान आभाळाचे) यांनी स्वरसाज चढवला आहे. दोन्ही गाणी वेगळ्या जॉनर ची असून उत्कृष्ट झाली आहेत जी प्रेक्षकांना खूप भावतील.
‘हॅपी बर्थ डे’ चित्रपटाला अंबरनाथ फिल्म फेस्टिवल मध्ये सर्वोत्कृष्ट प्रथम निर्मिती, सर्वोत्कृष्ट कथा, सर्वोत्कृष्ट गीतकार, सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेता, सर्वोत्कृष्ट संगीतकार, सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक आणि सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शक अशी सात नामांकनं आहेत.
येत्या २४ नोव्हेंबरला ‘हॅपी बर्थ डे’ प्रेक्षकांच्या हृदयाला स्पर्श करायला येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!