
आजपर्यंत खलनायक म्हणजे धिप्पाड, पोट सुटलेला, दाढी-मिशा असलेला अशी काहीशी इमेज निर्माण झाली आहे. मात्र, स्टार प्रवाहच्या ‘दुहेरी’ या मालिकेनं या समजाला छेद दिला आहे. या मालिकेतील बलवंत बल्लाळ हा मराठी टेलिव्हिजनवरचा सर्वांत स्टायलिश खलनायक आहे. अभिनेता अशोक शिंदे यांची व्यक्तिरेखा बलवंत बल्लाळ प्रेक्षकांची दाद मिळवत आहे.
मूळात बलवंत बल्लाळ या व्यक्तिरेखेचा ‘दुहेरी’ मालिकेतील प्रवेशच २०० भागांनंतर झाला. मात्र, अल्पावधीतच आपल्या स्टाईल कोशंटमुळे बलवंत बल्लाळ लोकप्रिय झाला. अगदी वेशभूषेपासून ते त्याच्या वागण्या-बोलण्यात असलेली सहजता त्याचं वेगळेपण अधोरेखित करत आहे. हावभाव, हसणं, उठण्या-बसण्याच्या पद्धती यांतून ही व्यक्तिरेखा वेगळी ठरत गेली. ‘कुठलीही भूमिका माझ्याकडे आल्यानंतर ती सकारात्मक आहे की नकारात्मक याचा मी पहिल्यांदा विचार करतो. त्यानुसार बलवंत बल्लाळचाही विचार केला. मात्र, ही भूमिका काहीशी वेगळ्या पद्धतीनं साकारावी असं मला वाटत होतं. त्यामुळे दिग्दर्शकाशी चर्चा करून काही लकबी ठरवल्या. त्याचं वावरणं, त्याचे कपडे हे खलनायकापेक्षा अँटी-हिरो म्हणून उठून दिसतात. त्यामुळे या व्यक्तिरेखेला एक ग्रेस मिळाली आणि हा खलनायक स्टायलिश झाला, जो कधीच टेलिव्हिजनवर पहायला मिळाला नव्हता,’ असं अशोक शिंदे यांनी सांगितलं.
फिटनेसबाबत प्रचंड जागरुक असल्याचं शिंदे यांनी सांगितलं. ‘नटाचं शरीर हे त्याचं माध्यम असतं. त्यामुळे आपल्या शरीराची, दिसण्याची आपण काळजी घेतली पाहिजे. आपण स्क्रीनवर दिसणार असल्यानं आपण चांगलंच दिसलं पाहिजे असं मला वाटतं. त्यामुळे मी रोज एक तास न चुकता व्यायाम करतो. त्याशिवाय आहारावरही लक्ष देतो. आजच नाही, गेली कित्येक वर्षं मी हे करतो आहे. चांगल्या फिटनेसमुळे मी फ्रेश राहतो. त्याचा फायदा मला भूमिका करताना होतो,’ असंही त्यांनी सांगितलं.
बलवंत बल्लाळ (अशोक शिंदे), त्याचा मुलगा विक्रम बल्लाळ (अंगद म्हसकर) आणि नातू दृश्यांत सूर्यवंशी (संकेत पथक) या तीन व्यक्तीरेखांतील नातं पुढे कसं उलगडतं, हे प्रेक्षकांना पाहायला मिळेल ‘दुहेरी’ या कौटुंबिक थरार मालिकेत, सोमवार ते शनिवार रात्री ८:३० वाजता फक्त स्टार प्रवाह वर.
Leave a Reply