
कोल्हापूर: इंटरनॅशनल नॅचरोपॅथी ऑर्गनायझेशन गेली अनेक वर्षापासून योग आणि निसर्गोपचाराचे प्रचार व प्रसाराचे काम करत आहे. अनेक वर्षांपासून पर्यायी चिकित्सा व निसर्गोपचार योग या क्षेत्रात ही संस्था 24 राज्ये व देशांमध्ये विस्तारलेली आहे. गुगलने संस्थेच्या कार्याची दखल घेत सर्वोत्कृष्ट असलेबाबत सन्मानित केले आहे. या संस्थेच्यावतीने येत्या 19 नोव्हेंबर रोजी रविवारी कणेरी मठ येथिल सिद्धगिरी रुग्णालय आणि रिसर्च सेंटर येथे राज्यस्तरीय सेमिनार ऑन नॅचरोपॅथी योग आयोजित करण्यात आले आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमधील 1000 पेक्षा अधिक प्रतिनिधींनी नोंदणी केली आहे. तसेच या सेमिनारमध्ये डॉ कुमुद जोशी, डॉ. जितेंद्र आर्य,डॉ. धनंजय गुंडे, सारंग पाटील,डॉ.सुभाषचंद्र मालाणी, योगी चिटणीस डॉ. गोविंद जयस्वाल असे अनेक अनुभवी चिकित्सकांचे मार्गदर्शन मिळणार आहे. परमपूज्य अदृश्य काडसिद्धेश्वर महाराज यांच्या अध्यक्षतेखाली पालक मंत्री चंद्रकांतदादा पाटील ,खा. धनंजय महाडिक, खा. संभाजी राजे छत्रपती, शाहू महाराज छत्रपती नामदार शेखर चरेगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत या सेमिनारचे उद्घाटन होणार आहे अशी माहिती कोल्हापूर चे पॅट्रॉन मेंबर पारस ओसवाल यांनी पत्रकार परिषदेत दिली. कोल्हापूर परिसर व पश्चिम महाराष्ट्रात निसर्गोपचार तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली विविध ठिकाणी वेगवेगळ्या आजारांवर नैसर्गिक उपचार केले जातात. असाध्य रोगांवर यातून आराम मिळतो याचा प्रचार व प्रसार करण्यासाठी आणि लोकांमध्ये जागरूकता वाढविण्यासाठी जाणीवपूर्वक वर्षभर कार्यक्रमांचे नियोजन करण्यात येणार आहे असे स्वागत कमिटी मेंबर सरलाताई पाटील यांनी सांगितले. तसेच सामान्य जनतेसाठी मोफत आरोग्य शिबिराची आयोजन केले जाणार आहे. भारत सरकार आयुश मंत्रालयाचे निसर्गोपचार व योगाचे एक सेंटर भविष्यात कोल्हापूर परिसरात व्हावी यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात येणार आहे अशी माहिती आंतरराष्ट्रीय निसर्गोपचार संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर अनंत बिरादार यांनी दिली. ते म्हणाले सरकारने लोकांच्या स्वास्थ्यासाठी व जनजागृतीसाठी बजेट ठेवले आहे. वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रारंभ केला पाहिजे. यासाठी लवकरात लवकर पावले उचलण्यात येणार आहेत. पत्रकार परिषदेला डॉ धनंजय मुंडे, प्रदीप भिडे डॉ संदीप पाटील, डॉ पल्लवी दळवी, सरचिटणीस मच्छिंद्र थोरात, जिल्हाध्यक्ष नामदेव पाटील, कोल्हापूर समन्वयक प्रकाश फाळके, अतुल भंडारी आदी मान्यवर उपस्थित होते.
Leave a Reply