शिवसेनेला नाकच राहिलेले नाही: माजी मुख्यमंत्री नारायण राणेंची टीका

 

कोल्हापूर: भाजपशी पटले नाही म्हणून पक्षाच्या खासदारकीचा राजीनामा देणाऱ्या नाना पटोलेंकडून शिवसेनेने स्वाभिमान शिकावा, असा उपरोधिक सल्ला महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक आणि ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी दिला. कोल्हापुरात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सत्ता सोडू आणि सरकारमधून बाहेर पडू असे म्हणायचे, खिशात राजीनामे असल्याचे इशारे द्यायचे आणि सतत सरकारसमोर नाक घासत राहायचे. वारंवार नाक घासल्याने आता शिवसेनेला नाकच राहिलेले नाही, अशीही कडवी टीका राणे यांनी केली.

महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या विस्तार सभेसाठी नारायण राणे यांनी कोल्हापुरात हजेरी लावली होती. त्याच अनुषंगाने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर त्यांन टीकेची तोफ डागली. ‘माझ्या वाघांनो’ असे उद्धव ठाकरे हे त्यांच्या सभेत कायम म्हणतात. त्यांनी जंगलात जाऊन कधी वाघ पाहिला आहे का? नुसती डरकाळी फोडल्याने काहीही होत नाही. पंतप्रधान असो किंवा मुख्यमंत्री फक्त टीका करायची म्हणून त्यांच्यावर उद्धव ठाकरे टीका करत आहेत, नशीब अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर बोलत नाहीत असे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवली.

‘द्या आणि घ्या’ (गिव्ह अँड टेक) या मुद्द्यावर आपण भाजपशी जोडले गेलो आहोत. भाजपने देण्यासाठी काही कालवाधी घेतला असावा असे म्हणत त्यांनी भाजपसंबंधीचा प्रश्न टाळला. तसेच काँग्रेस सोडल्यावरही राहुल गांधी किंवा सोनिया गांधी यांच्यावर टीका करणार नाही असेही त्यांनी म्हटले आहे. शिवसेना सोडल्यावरही आपण बाळासाहेब ठाकरे यांच्यावर कधीही टीका केली नाही असेही राणे यांनी स्पष्ट केले. मात्र काँग्रेसच्या विरोधातील विचारांची धार कायम राहणार आहे असेही त्यांनी सांगितले. नितेशचे नुकसान का करू? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. नितेश राणे काँग्रेसचा आमदार आहे. वेळ आल्यावर त्याबाबत निर्णय घेऊ तूर्तास त्याचे नुकसान करणार नाही असेही राणे यांनी पत्रकारांना सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!