
कोल्हापूर : डॉ.कौस्तुभ वाईकर यांच्याकडे न्युरोसर्जन होण्याकरिता आवश्यक डिग्री त्यांच्याकडे उपलब्ध नाही. त्यांनी हैद्राबाद येथे प्रशिक्षण घेतले पण त्याना डिग्री प्राप्त झालेली नाही. प्राईम हॉस्पिटलच्या पॅनेलवर न्यूरोसर्जरी करिता असणाऱ्या दोन्ही डॉक्टरांनी या रुग्णालयात आजतागायत एकही रुग्णावर उपचार किंवा साधी तपासणी केलेली नाही, असे असतानाही त्यांनी प्राईम हॉस्पिटल या त्यांच्या खाजगी रुग्णालयामध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांवर न्यूरोसर्जन असल्याची बतावणी करून शेकडो चुकीच्या शस्त्रक्रिया केल्या आहेत. त्यांच्या चुकीच्या शस्त्रक्रिया आणि उपचारामुळे अनेक निष्पाप रुग्णांचा नाहक बळी गेला असून, डॉ. कोस्तुभ वाईकर यांच्याविरोधात दाखल झालेल्या तक्रारींच्या अनुषंगाने त्यांच्या रुग्णालयाचा न्यूरोसर्जरी परवाना कोल्हापूर महानगरपालिका आरोग्य विभागाने रद्द केला आहे. चुकीच्या उपचारामुळे नागरिकांच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्या डॉ. कौस्तुभ वाईकर यांच्याविरोधात लवकरच फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती, आमदार राजेश क्षीरसागर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
या पत्रकात पुढे म्हंटले आहे कि, डॉ. कौस्तुभ वाईकर यांच्या चुकीच्या शस्त्रक्रियेने मृत्यू पावलेल्या रत्नागिरी येथील तेजस सुनील ठीक, कागल येथील आशिष सोनुले, हळदी, ता.करवीर येथील कृष्णात यल्लाप्पा बामणेकर, रविवार पेठ येथील अमित आबासाहेब शिंदे या रुग्णांच्या नातेवाईकानी जिल्हा पोलीस अधीक्षक यांचेकडे डॉ कोस्तुभ वाईकर यांच्यावर मनुष्यवधाचा आणि आर्थिक लुबाडणूकीचा गुन्हा दाखल करावा, असा तक्रार अर्ज दिला होता. यासह डॉ.कौस्तुभ वाईकर यांनी हॉस्पिटलचा परवाना घेताना संशयास्पद कागदपत्रांचा आधार घेऊन महानगरपालिका आरोग्य विभागाकडून परवाना घेतला होता. याची चौकशी करण्याची मागणी मी केली होती. प्राईम हॉस्पिटलच्या पॅनेलवर न्यूरोसर्जरी करिता डॉ. शंतनू अनिल गुंजोटीकर व डॉ.मदन भीमसेन जाधव हे कार्यरत असल्याचे नमूद केले आहे. दोन्ही डॉक्टर हे न्यूरोसर्जन असून त्यांनी आजअखेर प्राईम हॉस्पिटल मध्ये कोणत्याही रुग्णाची तपासणी अथवा न्यूरोसर्जरी बाबतची एकही शस्त्रक्रिया केली नसल्याचे कळविले आहे. त्यामुळे ज्या डॉक्टरांच्या आधारे या रुग्णांलयास परवानगी मिळविली त्याच डॉक्टरांनी आजतागायत प्राईम हॉस्पिटलमध्ये कोणतीही रुग्णावर उपचार केलेला नसल्याचा खुलासा केला असल्यामुळे डॉ. कोस्तुभ वाईकर हे रुग्णांसह प्रशासनाची फसवणूक करीत असल्याचे निदर्शनास येते. त्यांच्या चुकीच्या उपचार व शस्त्रक्रियेमुळे मृत्युमुखी पडलेल्या रुग्णाच्या मृत्यूस डॉ. कौस्तुभ वाईकर हेच सर्वस्वी जबाबदार आहेत. त्यामुळे त्यांच्या रुग्णालयाची मान्यता रद्द करण्यात यावी, अशी मागणी महानगरपालिका आरोग्य विभागाकडे केली होती. त्यानुसार महानगरपालिका आरोग्य विभागाने तातडीने नोटीस काढून आज डॉ. कौस्तुभ वाईकर यांचे प्राईम न्युरो व स्पाईन इंटेन्सिव्ह केअर युनिट, बेलबाग या रुग्णालयाचे न्यूरोसर्जरी नोंदणी परवाना रद्द केला आहे.
या पत्रकात पुढे म्हटले आहे कि, डॉ.कौस्तुभ वाईकर यांचे कृत्य हे वैद्यकीय क्षेत्राला काळीमा फासणारे असून, रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या आणि रुग्णाच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्या डॉ. कौस्तुभ वाईकर यांच्याकडे न्यूरोसर्जरी करिता आवश्यक वैद्यकीय पात्रता नसून, रुग्णांनी वेळीच सावध होऊन चुकीच्या उपचाराचे बळी पडण्यापासून वाचण्यासाठी या रुग्णालयात उपचार घेणे टाळावे, असे आवाहन आमदार राजेश क्षीरसागर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
Leave a Reply