कोल्हापूर-मुंबई विमानसेवेला मुहूर्त ;२४ डिसेंबरला होणार टेकऑफ:खा.धनंजय महाडिक 

 

कोल्हापूर :विमानतळावरून २४ डिसेंबरला विमानाचं टेकऑफ होईल, असे स्पष्ट संकेत मिळाले आहेत. २० डिसेंबरला पूर्वचाचणी घेऊन २४ डिसेंबरपासून आठवड्यातील ३ दिवस कोल्हापूर-मुंबई विमानसेवा सुरू होणार आहे. गेले ३ वर्षं खासदार धनंजय महाडिक कोल्हापूरची विमानसेवा सुरू कऱण्यासाठी सातत्यानं पाठपुरावा करत आहेत. खासदार महाडिक यांच्यासह पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेसुद्धा कोल्हापूर विमान सेवेबद्दल सकारात्मक होते. या पार्श्‍वभूमीवर आता २४ डिसेंबरला कोल्हापूर विमानसेवा सुरू होणार असल्यानं, कोल्हापूरच्या व्यापार, उद्योगाला गती मिळणार आहे.
सन २०११ पासून कोल्हापूरच्या विमानतळावरून प्रवासी वाहतूक सेवा बंद आहे. त्यामुळं कोल्हापूरच्या व्यापार, उद्योग आणि पर्यटन विश्‍वाला फटका बसला होता. त्यामुळं कोल्हापूरची विमानसेवा सुरू व्हावी, यासाठी सन २०१४ पासून खासदार धनंजय महाडिक प्रयत्नशील होते. खासदारपदाची सूत्रं हाती घेतल्यापासून कोल्हापूरच्या विविध प्रश्‍नांची सोडवणूक करताना कोल्हापूरची विमानसेवा सुरू व्हावी, हा अजेंड्यावरचा मुख्य विषय होता. त्यामुळे गेल्या ३ वर्षांत खासदार धनंजय महाडिक यांनी लोकसभेत आवाज उठवण्यापासून ते वरिष्ठ अधिकार्‍यांच्या बैठकांपर्यंत पाठपुरावा केला होता. या पार्श्‍वभूमीवर आता कोल्हापूर-मुंबई विमानसेवा सुरू होण्यास यश मिळालं आहे. येत्या २४ डिसेंबरला कोल्हापूर-मुंबई विमानसेवा सुरू होणार असून आठवड्यातून ३ दिवस नागरी वाहतूक सेवा सुरू होणार आहे. त्यामुळं कोल्हापूरकरांची प्रदीर्घ काळची मागणी पूर्ण होणार आहे. १६ डिसेंबरला कोल्हापूर विमानतळाला डे-ऑपरेटिंग परवाना मिळणार असून, २४ डिसेंबरला मुंबईहून कोल्हापूरला विमान येईल. त्यानंतर दर मंगळवार, बुधवार आणि रविवार अशा ३ दिवशी मुंबई-कोल्हापूर-मुंबई या मार्गावर एअर डेक्कनची विमानसेवा सुरू होईल. याबाबत खासदार धनंजय महाडिक यांनी वेळोवेळी बैठका घेतल्या होत्या.
२२ जून २०१४ ला कोल्हापुरातील व्यापारी, उद्योजकांची बैठक घेऊन विमानसेवा सुरू केल्यानंतर त्याला कसा प्रतिसाद मिळेल, याबाबत खासदार महाडिक यांनी चाचपणी केली होती. २२ जुलै २०१४ रोजी कोल्हापूर विमानतळाचा समावेश लो-कॉस्ट एअरपोर्टमध्ये झाला. तत्कालिन नागरी विमान उड्डाणमंत्री जी. एम. सिद्धेवरा यांनी त्याबाबतची घोषणा केली होती. त्यानंतर २५ ऑगस्ट २०१६ ला कोल्हापूर विमानतळाला संरक्षक भिंत बांधण्यासाठी १६ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात खासदार महाडिक यांना यश आलं. २७ ऑगस्टला त्याचा निविदाही प्रसिद्ध झाली. मार्च २०१६ मध्ये खासदार महाडिक यांनी तत्कालिन केंद्रीय नागरी विमान उड्डाण मंत्री अशोक गजपती राजू यांच्यासह वरिष्ठ अधिकार्‍यांसह दिल्लीत बैठक घेतली आणि कोल्हापूर विमानतळाच्या विकासासाठी २७० कोटी रुपयांची मागणी केली. त्याला केंद्रीय मंत्र्यांनी तत्काळ मंजुरी दिली. १९ सप्टेंबर २०१६ रोजी एअरपोर्ट ऍथॉरिटी ऑफ इंडियाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी कोल्हापूरला भेट देऊन विमानतळाची पाहणी केली आणि खासदार धनंजय महाडिक यांच्याशी विमानसेवा सुरू करण्याबाबत चर्चा केली. १८ ऑक्टोबर २०१६ ला एअरपोर्ट ऍथॉरिटी ऑफ़ इंडियाचे अध्यक्ष गुरूप्रसाद मोहापात्रा यांच्यासमोर २७४ कोटी रुपयांच्या कामाचा आराखडा सादर झाला आणि डे-परवाना मिळण्याबद्दल सविस्तर चर्चा झाली. १९ ऑक्टोबर २०१६ ला खासदार धनंजय महाडिक यांनी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनी कोल्हापूरच्या विमानतळासाठी २७४ कोटीपैकी ३० टक्के हिस्सा राज्य सरकार देईल, असं मान्य केलं. ३० मार्च २०१७ ला उडान योजनेअंतर्गत देशातील ४५ हवाई मार्ग घोषित झाले. त्यात कोल्हापूर, मुंबईचा समावेश होता. ६ एप्रिल २०१७ ला खासदार धनंजय महाडिक यांनी पुन्हा लोकसभेत कोल्हापूरच्या विमानसेवेबद्दलचा प्रश्‍न उपस्थित केला. त्यावेळी अशोक गजपती राजू यांनी खासदार महाडिक यांना आश्‍वासित केलं. तर २१ जुलै २०१७ ला खासदार धनंजय महाडिक यांनी पुन्हा लोकसभेत आवाज उठवला आणि विमान प्रवाशांना अधिकाधिक सुविधा मिळाव्यात, अशी मागणी केली. २५ ऑक्टोबर २०१७ ला विमानतळ प्राधिकरण आणि हवाई वाहतूक संचालनालय अधिकार्‍यांनी कोल्हापूर विमानतळाला भेट दिली आणि खासदार धनंजय महाडिक यांच्याशी चर्चा करून कोल्हापूर विमानसेवा लवकरात लवकर सुरू करण्याबाबत सहमती दर्शवली. दरम्यान, खासदार धनंजय महाडिक यांनी कोल्हापूरची विमानसेवा सुरू झाली नाही, तर संसदेत हक्कभंगाचा ठराव आणू, असंही जाहीर केलं होतं. वारंवार संबंधित खात्याचे मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी यांना भेटून, बैठका करून खासदार धनंजय महाडिक कोल्हापूर विमानतळ विस्तारीकरण आणि विमानसेवेचा प्रारंभ अशा दोन्ही पातळीवर मेहनत घेत होते. या सार्‍या प्रयत्नाची फलनिष्पत्ती म्हणून अखेर २४ डिसेंबरपासून कोल्हापूरच्या रनवेवर एअर डेक्कनचं विमान झेपावणार आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!