
कोल्हापूर : भारतीय डाक विभागाने स्पीड पोस्टसह अन्य टपाल सेवांमध्ये आधुनिकता आणि गतिमानता आणून टपाल सेवा अधिक लोकाभिमुख करण्यास प्राधान्य दिले असून टपाल सेवेबरोबरच नजीकच्या काळात आधार नोंदणी व आधार दुरुस्ती सुविधा केंद्रे डाकविभागाच्यावतीने सुरु करण्याचे प्रस्तावित असल्याचे गोवा परिक्षेत्राचे पोस्टमास्तर जनरल डॉ. एन.विनोदकुमार यांनी आज येथे बोलतांना स्पष्ट केले.
भारतीय डाक विभागामार्फत स्पीडपोस्ट, रजिस्टर एडी, तसेच पार्सल बुकींगसाठी (बल्कस्वरुपात) कोल्हापूर रेल्वे मेल सर्व्हिस कार्यालयात बिझनेस डेव्हलपमेंट सेल (व्यवसाय वृध्दी कक्ष) स्थापन करण्यात आला असून त्याचा शुभारंभ आज पोस्टमास्तर जनरल डॉ. एन.विनोदकुमार यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास कोल्हापूर डाक विभागाचे प्रवर अधिक्षक रमेश पाटील, रेल्वे मेल सर्व्हिसचे अधीक्षक जी. के. सेलिंग, डाक वस्तू भांडारचे अधिक्षक ए.आर.खोराटे, सहाय्यक अधिक्षक संजय देसाई आदी अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
डाक विभागामार्फत कोल्हापूर रेल्वे मेल सर्व्हिस कार्यालयात सुरु करण्यात आलेल्या या सुविधेमुळे जिल्ह्यातील बँका, वित्तीय संस्था तसेच पोस्टाच्या ग्राहकांना बल्क पोस्टींगसाठी उत्तम सुविधा उपलब्ध होत असल्याचे सांगून पोस्टमास्तर जनरल डॉ. एन.विनोदकुमार म्हणाले, पोस्टाची स्पीड पोस्ट ही सुविधा देशातील सर्वात उत्तम कुरीअर सुविधा असून यामुळे बल्क स्वरुपात पोस्टींग करणाऱ्या संस्था तसेच ग्राहकांचा वेळ, त्रास वाचणार आहे, तसेच या सुविधेतून टपाल सेवा अधिक गतीमान होणार आहे. ही सुविधा सकाळी 8 ते रात्री 8 या वेळेत सुरु राहणार असून या सुविधेसाठी 10 पेक्षा अधिक आर्टीकलसाठी पिकअप सर्व्हिसही सुरु करण्यात येत असून या सुविधेसाठी संस्था व ग्राहकांनी 0231-2657400 या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले.
कोल्हापूर शहरातील नागरिक तसेच व्यावसायिकांच्या पत्रव्यवहार व दळणवळणातील गरजा एकाच छताखाली व ग्राहकांच्या सोयीनुसार विस्तारित वेळेमध्ये उपलब्ध व्हाव्यात यासाठी कोल्हापूर शहरातील रेल्वे मेल सर्व्हिसच्या कार्यालयात सर्व अत्याधुनिक साधनसामुग्रीने सज्ज असलेला व्यवसाय वृध्दी कक्ष आजपासून कार्यरत झाला आहे. या सुविधेमार्फत अधिक प्रमाणात असलेल्या टपालाचे बुकींग होणार आहे, टपाल गोळा करणे, पाकीटामध्ये भरणे, पत्ता चिकटवणे, फ्रकिंग अशा प्रकारचे प्रीमेलींगचे काम करण्यात येणार आहे. या व्दारे स्पीड पोस्ट आणि बिझनेस पोस्ट /पार्सल/ एक्सप्रेस पार्सल असे टपाल गोळा करणे व बुकींग करण्यात येणार आहे. या कामासाठी कुशल पथके, पोस्टल एजंट टीम कार्यरत केली आहेत.
डाक विभागामार्फत इंटरनॅशनल ट्रॅक्ड पॅकेट सुविधा सेवा सुरु करण्यात आली असून आशिया पॅसिफिक विभागातील देशामध्ये शिपेमेंट पाठविण्यासाठी ही सेवा आर्थिकदृष्ट्या परवडणारी आहे. या सेवेचे वैशिष्ट्य म्हणजे2 किलोपर्यंतची पॅकेट, वेगवान सुविधा, ट्रॅक आणि ट्रेस, ई-कॉमर्ससाठी अनुकूल, पिकअप सुविधा, नुकसानासाठी भरपाई, अधिक प्रमाणात बुकींगसाठी सवलत देण्यात येणार आहे.
कोल्हापूर विभागातील चार मुख्य पोस्ट ऑफीसमध्ये आधार अद्ययावत सुविधा केंद्र सुरु केले असून या ठिकाणी आतापर्यंत 7 हजार 654 आधारकार्ड अद्यायावत करण्यात आली आहेत. या पुढील काळात जिल्ह्यातील निवडक 65 पोस्ट ऑफीसमध्ये आधार अद्ययावत करण्याची सुविधा उपलब्ध करण्याचे नियोजन असल्याची माहिती पोस्टमास्तर जनरल डॉ. एन.विनोदकुमार व प्रवर अधिक्षक रमेश पाटील यांनी दिली. ते म्हणाले, सर्व पोस्ट ऑफीसमध्ये आधार सीडिंगचे काम प्रगतीपथावर असून खातेदारांनी त्यांच्या पीओएसबी खात्याशी आधार आणि मोबाईल नंबर लिंक करावा असे आवाहनही श्री. पाटील यांनी केले.
प्रांरभी प्रवर अधिक्षक रमेश पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. शेवटी सहाय्क अधिक्षक संजय देसाई यांनी आभार मानले. या कार्यक्रमास डाक विभागातील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
Leave a Reply