
कोल्हापूर : श्री अंबाबाई मंदिरातील श्रीपूजक हटावून शासनाने पगारी पुजारी नेमावेत, या मागणीसाठी जून महिन्यापासून जनआंदोलन सुरु आहे. मी विधानसभा सभागृहात उपस्थित केलेल्या लक्षवेधी प्रश्नास उत्तर देताना, राज्य शासनाने ही मागणी मान्य केली असून हिवाळी अधिवेशापुर्वी शिर्डी, पंढरपूर देवस्थानच्या धर्तीवर श्री अंबाबाई मंदिरात शासनाचे पगारी पुजारी नेमण्याबाबत कायदा करण्यात येणार असल्याची ग्वाही विधी व न्याय राज्यमंत्री ना. रणजीत पाटील यांनी दिली होती. परंतु, या मूळ मुद्द्याला बगल देवून पगारी पुजारी नेमण्याचा प्रश्न भिजत ठेवण्याचा डाव शासनाने आखला असून, अधिवेशन संपत आले तरी या प्रश्नावर साधी चर्चा करण्याची तसदी शासनाने घेतलेली नाही. याविषयी तीव्र आंदोलन उभे करून शासनाचा हा डाव हाणून पाडू, असा इशारा कोल्हापूर शिवसेनेचे आमदार मा. राजेश क्षीरसागर यांनी सुरु असलेल्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात दिला. कोल्हापुरातील श्री अंबाबाई मंदिरात शासनाचे पगारी पुजारी नेमण्याच्या मागणीसाठी शिवसेनेचे आमदार मा.राजेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली आमदार प्रकाश आबीटकर, आमदार चंद्रदीप नरके, आमदार रमेश लटके यांनी “शासनाचा कासव गतीचा कारभार.. श्री अंबाबाई मंदिरात पगारी पुजारी नेमणूक कायद्यावर शासन का गप्पगार” अशा आशयाचा फलक घेऊन विधानभवनाच्या पायर्यांवर धरणे आंदोलन केले. यासह भाविकांची होणारी लुट थांबवून, श्री अंबाबाई मंदिरात जमा होणाऱ्या देणगीतून मंदिराचा विकास करण्याकरिता आणि परगावाहून येणाऱ्या भाविकांना मुलभूत सोयी सुविधा देण्याकरिता शासनाने तातडीने पगारी पुजारी नेमावेत, अशी मागणी पॉइंट ऑफ इन्फर्मेशन द्वारे करीत आमदार राजेश क्षीरसागर यांनी या प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधले.
यावेळी बोलताना आमदार राजेश क्षीरसागर यांनी, करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात पंढरपूर, शिर्डी मंदिरांच्या धर्तीवर शासनाचे पगारी पुजारी नेमावेत यासाठी समस्त करवीरवासियांच्यावातीने आंदोलन सुरु आहे. श्री अंबाबाई मंदिरामध्ये जमा होणाऱ्या देणगीची वारसदार पुजाऱ्याकडून लुट होत असून, गेले कित्तेक वर्ष श्री अंबाबाई मंदिरामध्ये मुलभूत सोई सुविधांचा वाणवा आहे. जुलै २०१७ च्या अधिवेशनामध्ये मी उपस्थित केलेल्या लक्षवेधी प्रश्नाच्या चर्चेवेळी, श्री अंबाबाई मंदिरात पगारी पुजारी नेमावेत यासाठी हिवाळी अधिवेशनात कायदा करण्यात येईल, अशी आश्वासने राज्याच्या मंत्री महोदयांनी दिली आहेत. परंतु अधिवेशन संपत आले तरी याविषयी सभागृहात साधा “ब्र” देखील काढण्यात आलेला नाही. शासन यामध्ये चालढकल करीत असून, श्री अंबाबाई देवीच्या भक्तांची फसवणूक केली जात आहे. त्यामुळे कोल्हापूर शहरामध्ये श्री अंबाबाई मंदिर कृती समितीच्या वतीने आज निदर्शने देखील करण्यात येत आहेत. याबाबत भाविकांच्या भावना तीव्र झाल्या आहेत. वस्तुस्थिती पाहता पगारी पुजारी नेमण्या करिता मा. जिल्हाधिकारी यांनी शासनाला अहवाल सादर करण्याचे आदेश मा. पालकमंत्री महोदयांनी दिले होते. परंतु, कोणताही निष्कर्ष न काढता हा अहवाल मा. जिल्हाधिकारी यांनी शासनास सादर केला आहे. हा अहवाल सादर करताना पालकमंत्री ना.चंद्रकांतदादा पाटील यांनी तीन महिन्यात निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते. परंतु या आश्वासनाची आजतागायत पूर्तता करण्यात आलेली नाही. त्यामुळे श्री अंबाबाई मंदिरामध्ये पगारी पुजारी नेमावेत, यासाठी स्वतंत्र कायदा शासनाने तयार करून पारित करावा, अशी आपली आग्रही मागणी आहे. अन्यथा शहरवासीयांमध्ये असलेल्या असंतोषाच्या भावना लक्षात घेता श्री अंबाबाई मंदिरामध्ये पगारी पुजारी नेमण्याकरीत पुढील काळात तिव्र आंदोलन उभे करण्यात येईल, असा इशाराही आमदार राजेश क्षीरसागर यांनी यावेळी दिला.
Leave a Reply