
कोल्हापूर: पुस्तकी ज्ञान घेऊन अभ्यासात गुण मिळवणे सध्या आवश्यक आहेच पण एखादी कला प्रत्येकाने अंगी जोपासली पाहिजे. भारतीय शास्त्रीय कला महान आहेत. कलेमुळे माणसाला जीवन जगण्याचा अर्थ समजतो. असे प्रतिपादन भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौ. अरुंधती महाडिक यांनी केले. डान्स मंत्रा या नृत्यसंस्थेच्या दशकपूर्ती सोहळ्यानिमित्त आयोजित ‘कथक रंग’ या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाचा संचालिका शुभांगी तावरे व त्यांच्या शिष्य वर्गाने शास्त्रीय नृत्यातील परंपरेनुसार ताल प्रस्तुती बरोबरच ठुमरी तराना, नायिका इत्यादी विविध नृत्याविष्कार सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली. यावेळी अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ मुंबईचे सचिव बाळकृष्ण विभुते आणि दैनिक क्रांतिसिंह च्या संपादिका सुनंदा मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते ज्येष्ठ पत्रकार व पुरोगामी विचारवंत प्रकाश मोरे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ पुरस्कार वितरण करण्यात आले.तसेच कथक या शास्त्रीय नृत्य परीक्षेत उज्वल यश संपादन केलेल्या विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास तबला व पखावज साथ-संगत संदिप तावरे हार्मोनियम साथ मयूरी ब्रह्मदंडे व्हायोलिन साथ मृणालिनी परुळेकर, बासरी साथ अमोल राबाडे, स्वरसाथ डॉ. आनंद धर्माधिकारी आणि गीता मनवाडकर यांनी केली.तब्बल १०० विद्यार्थिनींनी यावेळी आपला नृत्याविष्कार सादर केला.
डान्स मंत्रा ही नृत्यसंस्था गेली दहा वर्षे कथ्थक या शास्त्रीय नृत्याचे तसेच फोक व वेस्टर्न डान्स यांचे प्रशिक्षण देत आहे. कोल्हापुरात सहा शाखांसह शंभरहून अधिक विद्यार्थिनी नृत्याचे प्रशिक्षण घेत आहेत. अशी माहिती संस्थेच्या संचालिका शुभांगी तावरे यांनी आपल्या प्रास्ताविकात दिली. कार्यक्रमास अक्षय थोरवत व अरविंद बनसोडे यांनी विशेष परिश्रम घेतले.आभार सुनंदा मोरे यांनी मानले.तर सूत्र संचालन अक्षय थोरवत यांनी केले. कार्यक्रमास विद्यार्थी व पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Leave a Reply