
कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठाच्या प्रांगणात आज सायंकाळी सादर झालेली शिवकालीन युद्धकलांची प्रात्यक्षिके पाहून आज देशाच्या विविध ठिकाणांहून आलेले कुलगुरू अक्षरशः भारावले.
शिवाजी विद्यापीठ व ए.आय.यू. यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या पश्चिम विभागीय कुलगुरू परिषदेच्या पहिल्या दिवसाच्या सत्र समाप्तीनंतर सायंकाळी पाहुण्यांसाठी कोल्हापूरची अस्मिता असलेल्या शिवकालीन युद्धकलांचे प्रात्यक्षिक मुख्य प्रशासकीय इमारतीसमोरील प्रांगणात आयोजित करण्यात आले होते. स्व. वस्ताद ठोंबरे ग्रुपने ही प्रात्यक्षिके सादर केली. चार वर्षांच्या बालक-बालिकांपासून ते ७५ वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकांचा सहभाग असणारी ही प्रात्यक्षिके पाहून सारेच पाहुणे मंत्रमुग्ध झाले. तलवारबाजी, दांडपट्टा, लाठी फिरविणे यांच्यासह अनेक थरारक प्रात्यक्षिके कित्येकदा काळजाचा ठोकाही चुकला. सुमारे दीड तासांच्या या प्रात्यक्षिकांनंतर सर्व सादरकर्त्या कलाकारांवर पाहुण्यांनी कौतुकाचा वर्षाव केला. तसेच कुलगुरू डॉ. शिंदे यांच्या हस्ते स्मृतिचिन्हे देऊन त्यांना सन्मानितही करण्यात आले.
कुलगुरूंचा सन्मान कोल्हापुरी फेट्यांनी!
या प्रात्यक्षिकांना उपस्थित राहिलेले ए.आय.यू.चे पदाधिकारी, कुलगुरू व त्यांच्या प्रतिनिधींना कोल्हापुरी फेटा बांधण्यात आला. कुलगुरू डॉ. शिंदे यांनी आवर्जून कोल्हापुरी फेटा बांधून त्यांचा सन्मान करण्याचे नियोजन केले. तसेच, यावेळी प्रत्येक कुलगुरूंचा विद्यापीठाचे स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. शिवपुतळ्यासमोरील उद्यानात फेट्यांसह फोटो काढून घेण्याचा मोह पाहुण्यांना आवरता आला नाही. शिवाजी विद्यापीठाचा परिसर प्रेमात पडावा असा आहे आणि प्रांगणातील शिवपुतळा देशप्रेमाने भारावून टाकणारा आहे, अशी प्रतिक्रियाही पाहुण्यांनी व्यक्त केली.
Leave a Reply