
कोल्हापूर: आयसीटी बेस्ड शिक्षण प्रणाली शिक्षकाला कधीही पर्याय ठरू शकत नाही; तर, अधिक पूरकच ठरेल, असे प्रतिपादन सी-डॅकचे सहसंचालक व ‘डब्ल्यू-थ्री-सी इंडिया’चे कंट्री मॅनेजर महेश कुलकर्णी यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठात सुरू असलेल्या पश्चिम विभागीय कुलगुरू परिषदेच्या दुसऱ्या दिवशीच्या दुसऱ्या सत्रात ते बोलत होते. सत्राच्या अध्यक्षस्थानी जयपूरच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे प्रा. एस.एम. सोनी होते.
श्री. कुलकर्णी म्हणाले, माहिती संवाद तंत्रज्ञानाधारित साधने व सुविधा या अध्ययन अध्यापन प्रक्रिया अधिक प्रवाही करण्यासाठी उपयुक्त ठरतात. त्यांच्या मुळे शिक्षकाचे महत्त्व कमी होत नाही. उलट माहितीचा ओघ विद्यार्थ्यांपर्यंत मोठ्या प्रमाणात पोहोचत असल्यामुळे शिक्षकांवरील जबाबदारी वाढली आहे. विद्यार्थ्यांना उपलब्ध असणाऱ्या माहितीचे विश्लेषण करून त्या माहितीचे ज्ञानात रुपांतर करून त्यांना अधिक प्रगल्भ बनविण्याची जबाबदारी शिक्षकच यथार्थपणे पार पाडू शकतात.
श्री. कुलकर्णी यांनी आपल्या सादरीकरणा दरम्यान भविष्यातील शैक्षणिक साधनांची व्याप्ती स्पष्ट केली. ते म्हणाले, ई-बुक्स, ई-पब सारख्या इंटरॅक्टीव्ह माध्यमांबरोबरच वेब व टीव्ही बेस्ड लर्निंग, टी-गव्हर्नन्स यांचा वापर शिक्षण पद्धतीत अनिवार्य आहे. आपल्याकडे गुणवत्तापूर्ण विद्यार्थ्यांची कमी नाही. त्यांना संशोधनासाठी आणि त्यापेक्षाही पेटंट मिळवून देणाऱ्या संशोधनासाठी प्रेरित करण्याची गरज आहे. आपल्या विद्यापीठांतून भरीव संशोधन सुरू आहे. मात्र पाश्चात्य देशांच्या तुलनेत पेटंटिंगच्या बाबतीत आपण मागे पडतो. ही उणीव भविष्यात भरून काढण्याची गरज आहे.
भविष्यात शिक्षण पद्धतीवर प्रभाव टाकतील अशा अभिनव क्षेत्रांची माहितीही त्यांनी आपल्या व्हीजन-२०३५च्या माध्यमातून दिली. यामध्ये थ्री-डी प्रिंटीग, प्लास्मॉनिक्स, फोटोनिक्स, सिमँटेक वेब, सिंथेटिक बायॉलॉजी, सोलार टेक्नॉलॉजीज, स्मार्ट फॅब्रिक्स, क्वांटम कम्प्युटिंग, रिअल टाइम स्पीच टू स्पीच ट्रान्सलेशन टेक्नॉलॉजी, ऑप्टो-जेनेटिक्स, ॲडव्हान्स्ड जिनॉमिक्स, बायो-मिमॅटिक्स, नेचर इन्स्पायर्ड रोबोटिक्स इत्यादी अनेक नवीन शाखांचा उदय माहिती तंत्रज्ञान क्रांतीमुळे होतो आहे. त्याला पूरक व पोषक अशा प्रकारचे कुशल मनुष्यबळ विद्यापीठीय स्तरावर विकसित करण्याची गरज आहे. ऑनलाइन कम्प्युटिंगच्या क्षेत्रात नैसर्गिक भाषा प्रोसेसिंग (एन.एल.पी.) हे भविष्य आहे, असेही त्यांनी सांगितले. तसेच, सायबर सिक्युरिटी, डाटा जनरेशन व मेंटेनन्स यांसारख्या आव्हानांवर मात करून आपल्याला या नवतंत्रज्ञानासह पुढे जाण्याची जाणीवही त्यांनी करून दिली.
तत्पूर्वी, आजच्या पहिल्या सत्रात बॉश या मल्टिनॅशनल कंपनीच्या वतीने श्रीमती सुमिता रमेश व श्रीराम एस. यांनी सादरीकरण केले. शैक्षणिक संस्था व उद्योग यांच्या सहकार्य वृद्धीची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. बॉश कंपनीतर्फे विविध विद्यापीठे व शैक्षणिक संस्थांमध्ये चालविलेल्या अभ्यासक्रमांची माहितीही त्यांनी दिली. टेलर-मेड अभ्यासक्रमांच्या माध्यमातून कंपन्यांना आवश्यक असणारे कुशल व प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध होते. त्यामुळे असे व्यावसायिक अभ्यासक्रम बी.व्होक. व टेक्विपच्या माध्यमातून विद्यापीठांतून राबविले जाणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
Leave a Reply