
कोल्हापूर: देशाची ध्येयधोरणे ठरविण्याचे महत्वपूर्ण काम संसदेत चालते. लोकसभा आणि राज्यसभेमध्ये विविध विषयांवर चर्चा, विधेयक-कायदे मंजुरी यांचा समावेश असतो. आपला देश युवकांचा देश म्हणून ओळखला जातो. म्हणूनच सरकारची धोरणे ठरविताना, युवा वर्गाची विशेषतः विद्यार्थ्यांची भूमिका महत्वाची आहे. सध्याची तरूणाई जबाबदार आणि अभ्यासू आहे. त्यांची स्वत:ची ठोस मतं आहेत. युवकांच्या या सकारात्मक उर्जेचा समाजासाठी आणि देशहितासाठी उपयोग व्हावा, या उद्देशाने कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक यांनी अभिनव उपक्रम सुरु केला आहे. याअंतर्गत विद्यार्थ्यांनी देशाचे धोरण निदेश्चित करणारे प्रश्न विचारायचे आहेत. उत्कृष्ट प्रश्न विचारणार्या विद्यार्थ्यांना खासदार धनंजय महाडिक थेट दिल्ली मध्ये नेवून संसदेचे कामकाज पाहण्याची संधी देणार आहेत. येत्या ५ माचर् पर्यंत कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील विद्यार्थ्यांनी प्रश्न पाठविण्याचे आवाहन, खासदार धनंजय महाडिक यांनी केले आहे.
या अभिनव उपक्रमाची माहिती देताना खासदार धनंजय महाडिक म्हणाले, गेल्या साडेतीन वर्षात कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील व देशभरातील अनेक प्रश्न संसदेत उपस्थित केले आहेत. आतापर्यंत ८८४ प्रश्न संसदेमध्ये विचारले असून, ४६ वेळा चर्चेत सहभाग घेतला आहे. त्याचबरोबर अनेक खाजगी विधेयके संसदेत सादर केली आहेत. जिल्ह्यातील अनेक प्रलंबित विकासकामे मार्गी लावण्यासाठी संसदेत प्रश्न उपस्थित करणे महत्वाचे ठरले. अनेक कायद्यांमध्ये दुरुस्ती सुचवून, लोककल्याणकारी कामे मार्गी लावता आली. भारतीय लोकशाही बळकट करण्यासाठी, तरुणांचा सहभाग महत्वाचा आहे. युवा वर्गाने संसदीय कार्यप्रणालीची माहिती घ्यावी, तसेच ध्येयधोरणे ठरविण्यात त्यांचा थेट सहभाग व्हावा, त्यांची मते – विचार सरकारपर्यंत पोहचावीत, विद्यार्थी आणि सरकार यांच्यामधील एक दुवा बनावे, या उद्देशाने या उपक्रमाची सुरवात करत आहोत. विद्यार्थी देशात कोणते बदल घडवू इच्छितात, त्यांना नवीन काय करावे वाटते, युवा वर्गाच्या दृष्टीने महत्वाचे प्रश्न कोणते आहेत, हे या उपक्रमातून समजणार असून, ते आपण सरकारच्या निदर्शनास आणून देणार आहे. आगामी लोकसभेच्या अधिवेशनात जे प्रश्न संसदेत मांडावेत, असे विद्यार्थ्यांना वाटते, ते खासदार महाडिक यांना सादर करावेत. असे प्रश्न विद्यार्थ्यांनी सविस्तरपणे, सुवाच्च अक्षरात लिहून पाठवावेत. एका विद्यार्थ्याने एकच प्रश्न पाठवावा. प्रश्न मराठी, हिंदी किंवा इंग्रजी या तिन्ही भाषांपैकी कोणत्याही एका भाषेत असावेत. प्रश्न पाठविण्याची मुदत ५ मार्च पर्यंत आहे. त्यासाठीची प्रवेशिका, येत्या आठवड्याभरात शाळा आणि महाविद्यालयांमध्ये उपलब्ध होणार आहे. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील आठवी ते पदवीच्या विद्यार्थ्यांना प्रश्न पाठविता येणार आहेत. विद्यार्थ्यांनी पाठविलेल्या प्रश्नांची छाननी केली जाईल आणि त्यातून ड्रॉ द्वारे उत्कृष्ट प्रश्न सुचवलेल्या विद्यार्थ्यांना लोकसभेचे कामकाज पाहण्याची संधी मिळणार आहे. त्यासाठी तालुकावार आणि कोल्हापूर शहर असे ड्रॉ काढले जाणार आहेत. ज्या विद्यार्थ्यांचे प्रश्न निवडले जाणार आहेत, अशांना दिल्लीवारीची संधी मिळणार आहे. या विद्यार्थ्यांच्या प्रवासाचा तसंच निवास- भोजनाचा संपूर्ण खर्च धनंजय महाडिक युवाशक्तीच्या माध्यमातून केला जाणार आहे, असेही खासदार महाडिक यांनी सांगितले. mpdhananjaymahadik@gmail.com या ई मेल आयडीवर देखील विद्यार्थी प्रश्न पाठवू शकतील. या संदर्भातील अधिक माहितीसाठी ९४२३५७५५७७ या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा, असे आवाहन खासदार महाडिक यांनी केले आहे.
Leave a Reply