मसाईपठाच्या पायथ्याशी साकारतोय व्हर्टीकल ॲडव्हेंचर पार्क

 

 कोल्हापूर: पन्हाळ्याशेजारील मसाई पठराच्या पायथ्याशी पर्यटकांना आकर्षित करणारा व्हर्टीकल ॲडव्हेंचर पार्क साकारत आहे. वन विभागाच्यावतीने विकसित करण्यात येत असलेल्या या “प्रकल्पास लेटस मिस ए हार्ट बीट” ही टॅग लाईन असून झिपलाईन या सर्वार्थांने महत्वाच्या असणाऱ्या उपक्रमाबरोबरच वेगवेगळया 9 इलिमेंटस ॲक्टीव्हीटीचा या पार्कमध्ये समावेश करण्यात आला आहे. यामध्ये प्रामुख्याने झिपलाईन, क्लांमींग बॉल, रॉक क्लामींग ॲन्ड रॅपलींग, हाय रोप कोडस, पारंपरिक साहसी खेळांची अनुभूती देणारे स्लीक लाईन, झॉरबिंग बॉल, बंजीइजेक्शन आणि पठारावर पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या पॅरासिलींगचा समावेश आहे. स्लॅक लाईन आणि पठारावर पॅराशुट अशा पर्यावरणपूरक नाविण्यपूर्ण उपक्रमांची मेजवाणी नजीकच्या काळात निसर्गप्रेमी नागरिक आणि पर्यटकांना उपलब्ध होईल.

ऐतिहासिक निसर्गरम्य पन्हाळगड आणि निसर्गाचे विस्तिर्ण रुप लाभलेलं मसाई पठार देशातील पर्यटकांना साद घालू लागले आहे. पावसाळा आला की पर्यटकांची पाऊले पन्हाळ्याच्या तटबंदीजवळून मसाई पठाराकडे आपोआपच वळतात. विविध प्रकारच्या वृक्षवल्ली आणि फुलांच्या ताटव्याचं अनोखं दर्शन तसेच पशुपक्षांच्या वर्दळीनं पर्यटकांच्या डोळयांचे पारणं फिटतयं. आता यात वन विभागाने मोलाची भर घालत व्हर्टीकल ॲडव्हेंचर पार्कच्या उभारणीस गती दिली आहे. वन विभाग आणि संयुक्त वन व्यवस्थापन समिती, जिऊरमार्फत मसाई पठराच्या पायथ्याशी भव्य व्हर्टीकल ॲडव्हेंचर पार्क साकारु लागला आहे. पहिल्या टप्यातील कामांना गती आली असून हा व्हर्टीकल ॲडव्हेंचर पार्क आतापासूनच पन्हाळा आणि मसाई पठारावर येणाऱ्या देशातील तसेच परदेशी पर्यटकांना साद घालू लागला आहे. कोल्हापूरच्या वन विभागाचे उप-वनसंरक्षक डॉ. प्रभुनाथ शुक्ल यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकल्पाचे काम युध्द पातळीवर सुरु आहे.
या व्हर्टीकल ॲडव्हेंचर पार्कमध्ये प्रामुख्याने झिपलाईन अर्थात बोलीभाषेतील रोप वे खऱ्या अर्थाने पर्यटकांचे खास आकर्षण ठरणार आहे. त्यापाठोपाठ क्लायमिंग बॉल, रॉक क्लायमिंग ॲन्ड रॅपलींग, हाय रोप कोडस, पारंपरिक साहसी खेळांची अनुभूती देणारे स्लीक लाईन, झॉरबिंग बॉल, बंजी इजेक्शन आणि पठारावर पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या पॅरासिलींगचा समावेश आहे. स्लॅक लाईन, पठारावर पॅराशुट या उपक्रमाबरोबरच निसर्ग व पशू-पक्षीप्रेमींना पर्यावरणपूरक उपक्रमाची माहिती देण्याची सुविधाही विकसित केली जाणार आहे. या परिसरात येणाऱ्या विद्यार्थ्यांना नैसर्गिक चिल्ड्रन पार्क अर्थात बालोद्यान आणि युवकांना साहसी मर्दांनी खेळांची सुविधाही रोमहर्षकच राहणार आहे. पन्हाळा आणि मसाईपठारच्या कुशीत विकसित होत असलेला हा व्हर्टीकल ॲडव्हेंचर पार्क पर्यटकांना निश्चितपणे भुरळ घालेल, यात मात्र शंका नाही.
या व्हर्टीकल ॲडव्हेंचर पार्कच्या उभारणीसाठी जिल्हा नियोजन समितीच्यावतीने पहिल्या टप्प्यात एक कोटीहून अधिकचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. या व्हर्टीकल ॲडव्हेंचर पार्कचे काम गतीने करण्यासाठी जिल्हयाचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी प्रशासकीय यंत्रणा गतीमान केली आहे. ॲडव्हेंचर पार्कसाठी वन विभाग आणि संयुक्त वन व्यवस्थापन समितीकडे निधी वर्ग करण्यात आला असून मसाई पठाराच्या पायथ्याशी जिऊर ग्रामपंचायत हद्दीत सुमारे एक हेक्टर क्षेत्रात हा व्हर्टीकल ॲडव्हेंचर पार्क उभारु लागला आहे. पन्हाळा आणि मसाई पठाराच्या दिशेने येणाऱ्या पर्यटकांचे व्हर्टीकल ॲडव्हेंचर पार्क एक आकर्षण ठरू लागले आहे.
व्हर्टीकल ॲडव्हेंचर पार्कच्या पहिल्या टप्प्यात पर्यटकांसाठी पाच पर्यावरणपुरक नैसर्गिक निवासी तंबूची उभारणी करण्यात येत असून भोजनगृह, स्वच्छतागृह, माँर्निंग वॉक ट्रॅकच्या उभारणीचे नियोजन आहे. या परिसरात पर्यावरणपूरक अंतर्गत रस्ते आणि नैसर्गिक पायवाटा विकसित केल्या जाणार असल्याने येथील निसर्ग सौंदर्याचा आणि निसर्ग संपदेच्या सान्निध्यात राहून निसर्गाचा आस्वाद घेता येणार आहे. पर्यटकांसाठी ठिकठिकाणी बाकडी, वृक्षांना कट्टे अशा उपक्रमांचाही समावेश आहे. लहान मुलांसाठी बालोद्यान, विविध प्रकारच्या गेम्स, पशू-पक्षी व निर्सग प्रेमींसह वृक्षसंवर्धनसाठी विविध उपक्रमांना प्राधान्य दिले आहे.
कोल्हापूर शहराच्या अगदी जवळ असणाऱ्या निसर्ग सौंदर्याची उधळण करणाऱ्या ऐतिहासिक पन्हाळगडाबरोबरच विस्तिर्ण पठार लाभलेल्या मसाई पठाराचे या व्हर्टीकल ॲडव्हेंचर पार्कमुळे रुपच पालटणार आहे. वन विभागाच्यावतीने एकाच ठिकाणी इतक्या ॲक्टीव्हीटीज उपलबध करुन देणारा हा बहुतांशी राज्यातील एकमेव प्रकल्प मानला जातो. मसाई पठारावरील अतिभव्य टेबल लँडही पर्यटकांचे प्रमुख आकर्षण असून व्हर्टीकल ॲडव्हेंचर पार्कच्या पूर्तीनंतर पन्हाळागड आणि मसाई पठारला जागतिक किर्ती लाभेल, यात मात्र शंका नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!