
नवी मुंबई :- मुंबई आणि महाराष्ट्रात ज्या वेगाने पायाभूत सुविधांची कामे सुरु आहेत, ते पाहता 2022 पर्यंत मोठा विकास झालेला आपण पाहाल, अशा शब्दात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राज्यातील विकास कामांच्या अंमलबजावणीची प्रशंसा केली. हवाई वाहतूक आणि जल वाहतूक क्षेत्रातही झपाट्याने विकास होत असून यामुळे देशाला जागतिकीकरणाचा खरा लाभ मिळेल. मुंबईमधील जल, भूमि आणि आकाश अशा ठिकाणी सुरु असलेल्या विविध कामांमुळे खऱ्या अर्थाने विकास होईल, त्याचप्रमाणे शिवरायांचे प्रेरणा देणारे स्मारक देखील समुद्रात उभे राहिलेले असेल, असेही ते म्हणाले.
नवी मुंबई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे भूमिपूजन व जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्र्स्टच्या चवथ्या कंटेनर टर्मिनलचे लोकार्पण इलेक्ट्रॉनिक पध्दतीने कळ दाबून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज उलवे गावाजवळील कोंबडभुजे येथे करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.
प्रस्तावित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या भव्य मैदानावर आयोजित या शानदार सोहळ्यास राज्यपाल चे विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,केंद्रीय रस्ते वाहतुक आणि महामार्ग, नौकानयन व जलस्त्रोत मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री पी. अशोक गजपथी राजू, रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण, आ.प्रशांत ठाकूर आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
आपल्या भाषणाची सुरुवात मराठीतून करतांना प्रधानमंत्री मोदी म्हणाले की “छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजधानी असलेल्या या रायगड भूमीमध्ये हे आंतरराष्ट्रीय विमानतळ होत आहे, या स्वराज्य भूमीला माझा प्रणाम” छत्रपती शिवरायांची जयंतीच्या आदल्या दिवशी जेएनपीटीच्या चवथ्या टर्मिनलचे उद्घाटन आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे भूमीपुजन अशा दोन संधी मिळणे हा चांगला योगायोग आहे. सागरी शक्तींचे महत्व ओळखणारे छत्रपती शिवराय हे पहिले राष्ट्रपुरुष होते. ते किती दूरदृष्टी असलेले होते याची कल्पना आज जेव्हा आम्ही सागरी शक्तींमध्ये वाढ करीत आहोत तेव्हा लक्षात येते.
आज देशाला लाभलेल्या 7 हजार 500 कि.मी. सागरी किनाऱ्याचा सर्वांगिण विकास करून सागरी शक्ती वाढविण्यासाठी आम्ही महत्वपूर्ण पाऊले उचललेली आहेत असे सांगून प्रधानमंत्री म्हणाले की ,100 हून अधिक जलमार्गाचे नियोजन आम्ही केले आहे.
नवी मुंबईत उभारण्यात येणारे हे आंतरराष्ट्रीय विमानतळ स्वातंत्र्यानंतरचे पहिले ग्रीन फिल्ड विमानतळ असेल. अनेक सरकारे आली पण एअरपोर्टचे स्वप्न तसेच राहीले होते. 1997 मध्ये वाजपेयी सरकारच्या काळात त्या ठिकाणी विमानतळ व्हावे अशी कल्पना पुढे आली होती. मी प्रधानमंत्री झाल्यावर देशातील महत्वपूर्ण पायाभूत सुविधांना वेग देण्यासाठी“प्रगती” नावाचा एक कार्यक्रम सुरु केला. त्यामार्फत राज्यांतील सचिवांशी थेट चर्चा करून येणाऱ्या अडचणी सोडविल्या. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा लोकप्रिय मुख्यमंत्री असा उल्लेख करुन प्रधानमंत्री म्हणाले की, अशाच एका व्हिडीओ कॉन्फरसिंगमध्ये मुख्यमंत्र्यांनी नवी मुंबई विमानतळाचे काम विविध परवानग्या अभावी थांबले असल्याचे सांगितले. आम्ही तात्काळ त्याचवेळी सर्व आवश्यक परवानग्या दिल्या. 10 लाख कोटी रुपयांचे विविध प्रलंबित प्रकल्प मार्गी लावले असून त्यात हाही एक प्रकल्प होता.
Leave a Reply