
कोल्हापूर: नियोजनबद्ध परिश्रम, सातत्य, चिकाटी विद्यार्थ्याने अंगीकारून आत्मनिर्भरपणे स्वप्नांचा पाठलाग केला पाहिजे. आणि ती केवळ पाहू नयेत आणि स्वप्नातही राहू नये.प्रयत्नाशिवाय यश नाही यशाशिवाय व्यक्तिमत्व विकास होत नाही असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे बी सी डी यु चे संचालक डॉ. डी. आर. मोरे यांनी काढले. श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस संचालित न्यु कॉलेजच्या वार्षिक वितरण समारंभप्रसंगी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले “शिक्षण क्षेत्रात गुणवत्तेसाठी स्पर्धा होणे काळाची गरज असताना आज मात्र व्यवसायिक स्पर्धा जोमाने वाढीला लागली आहे. ही शिक्षणाच्या व्यापारीकरणाची चिंताजनक गोष्ट आहे . शिक्षणाचे व्यापारी खाजगीकरण रोखण्यासाठी वेळीच शिक्षण चळवळ उभारणे काळाची गरज आहे. समारंभाचे अध्यक्ष श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंगचे चेअरमन डी. बी. पाटील यांनी आपल्या भाषणामध्ये गुणवत्ता आत्मनिर्भरता विकास बांधिलकी ही शिक्षणाची चतु:सूत्री आहे. विद्यार्थ्यांनी तिचा अवलंब करावा. काही माणसे कामाच्या पाठी मागे पळतात.तर काही माणसांच्या पाठीमागे कामे पळून येत असतात. नोकरीच्या संधी चालून येतील त्यासाठी तुम्हाला गुणवंत व्हावे लागेल. यश आणि अपयश या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.असा विद्यार्थ्यांना यशाचा मूलमंत्र दिला.स्वागत व प्रास्ताविकामध्ये प्राचार्य डॉ एन.व्ही नलवडे यांनी कला, क्रीडा, शिक्षण, विज्ञान, संशोधन या चौफेर क्षेत्रात महाविद्यालयाच्या यशवंत विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशामुळे न्यू कॉलेज हे शिक्षण क्षेत्रातील गुणवत्तेचा मानदंड ठरले आहे असे प्रतिपादन केले. यावेळी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय तसेच विद्यापीठ, आंतरविद्यापीठ स्तरावर यश संपादन केलेल्या खेळाडू आणि यशवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. या पारितोषिक वितरण समारंभात श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाउसचे संचालक ए.जी वणीरे, प्राचार्य डॉ पी के पाटील, आर .बी खोडवे, विद्यार्थी प्रतिनिधी अभिषेक श्रीराम यांची प्रमुख उपस्थिती होती. पारितोषिक वितरण अहवालाचे वाचन जिमखाना प्रमुख प्रा.अमर सासणे यांनी केले.सूत्रसंचालन सिनेअभिनेते धनंजय पाटील आणि वक्तृत्व पट्टू अनूसया रावत यांनी केले. मराठी विभाग प्रमुख प्रा. जी आर पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी विजेते विद्यार्थी,पालक प्राध्यापक, महाविद्यालयाचा सेवक वर्ग तसेच कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Leave a Reply