
कोल्हापूर: युवती आणि महिलांच्या सक्षमीकरणासाठी गेल्या १० वर्षापासून भागीरथी महिला संस्था अव्याहतपणे काम करत आहे. महिला बचत गटांचे सबलीकरण, महिलांना विविध वस्तू बनविण्याचे प्रशिक्षण, युवतींसाठी स्वसंरक्षण, कला-क्रीडा-आरोग्य विषयक उपक्रम राबवून, भागीरथी युवती मंच आणि भागीरथी महिला संस्था नियोजनबद्ध काम करत आहे. आजवर सुमारे ४० हजार पेक्षा अधिक महिलांना विविध वस्तू बनविण्याचे प्रशिक्षण देवून, त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा संस्थेचा प्रयत्न यशस्वी ठरला आहे. महिला सबलीकरणाच्या बरोबरीने युवती-महिलां मधील कलागुणांना वाव मिळावा, त्यांचे व्यक्तिमत्व अधिक प्रभावी बनावे, हा संस्थेचा प्रामाणिक प्रयत्न आहे. आर्थिक उन्नतीच्या बरोबरीने सामाजिक जाणिव विकसित करण्याचे काम, भागीरथी संस्थेने केले आहे. वैयक्तिक स्तरावर, कौटुंबिक स्तरावर आणि सामाजिक स्तरावर प्रगती साधण्यासाठी भागीरथी संस्था विविध उपक्रम राबवत आहे. त्याचाच एक भाग म्हणून, आता भागीरथी महिला संस्था नवा उपक्रम सुरु करत आहे. वाचन संस्कृतीच्या प्रचार आणि प्रसारासाठी आता गावागावात भागीरथी वाचनालय सुरु करण्यात येणार आहे. या वाचनालयांसाठी कोणीही पुस्तके भेट देवू शकतो. आपल्याकडे असणारी प्रसिद्ध लेखकांची दर्जेदार आणि वाचनीय पुस्तके, संग्राह्य ग्रंथ, कथा, कादंबर्या, दिवाळी अंक किंवा कोणत्याही मराठी वाङ्मय प्रकारातील उत्तम स्थितीतील नवी-जुनी पुस्तके आपण भागीरथी वाचनालयाकडे देवू शकता. धनंजय महाडिक युवाशक्ती आणि भागीरथी महिला संस्थेने सुरुवातीला २५ हजार पुस्तके देवून, भागीरथी वाचनालयाची पायाभरणी केली आहे. यापुढे जाणकार जनतेच्या आणि वाचकांच्या पाठबळावर गावागावात भागीरथी वाचनालय सुरु करण्याचे नियोजन आहे. २५ फेब्रुवारी ते ५ मार्च या दरम्यान जनतेकडून पुस्तके स्विकारली जातील. स्टेशन रोड कॉर्नर येथील कैलाश टॉवर मधील भागीरथी संस्थेचे कार्यालय आणि टाकाळा येथील शाहू जलतरण तलाव या ठिकाणी पुस्तके स्विकारली जातील. तर जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून, ८ मार्च रोजी ११ ठिकाणी भागीरथी वाचनालयांचा शुभारंभ होईल आणि प्रत्यक्ष पुस्तकांचे वितरण केले जाईल.शिवाय अशिक्षित लोकांसाठी पुस्तकाचे सामुहिक वाचन करणे, दर १५ दिवसांनी एखाद्या पुस्तकावर चर्चासत्र घडवणे (पुस्तकाचे अंतरंग) असेही कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. लोप पावत चाललेल्या वाचन संस्कृतीचे संवर्धन करुन, नव्या पिढीला दिशा देण्याचा आणि मनोरंजनासह ज्ञान, माहितीचा खजिना देण्याचा भागीरथी महिला संस्थेचा प्रयत्न आहे. वाचाल तर वाचाल, ही उक्ती सार्थ ठरवून, वाचनालयाच्या माध्यमातून नव्या पिढीला वाचनाची गोडी लावण्याचा आणि त्यातून त्यांची वैचारिकता आणि व्यक्तिमत्व समृद्ध करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. अनेक नव्या-जुन्या लेखकांची वाङ्मय संपदा समाजासमोर यावी, हाही प्रयत्न असणार आहे. अजब पब्लिकेशनच्या वतीनं या उपक्रमाला सहकार्य करण्यात आलंय. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी भागीरथी वाचनालयाला जास्तीत जास्त पुस्तके भेट द्यावीत आणि सुसंस्कारित युवा पिढी घडविण्यासाठी आपणही हातभार लावावा, असे आवाहन भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौ. अरुंधती महाडिक यांनी केले आहे
Leave a Reply