
कागल : सिद्धगिरी हॉस्पिटल कणेरी आयोजित आरोग्य शिबीर कागल तालुक्यातील शेंडूर गावात संपन्न झाले. या मध्ये १८२ रुग्ण सहभागी झाले होते. यामध्ये सर्व साधारण तपासणी सह १०८ रुग्णांनी डोळे तपासणीचा हि दुहेरी लाभ घेतला.
प्रारंभी शेंडूरचे प्रथम नागरिक – सरपंच तुकाराम पवार यांनी सर्वांचे स्वागत करताना “प. पु. अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजीचा शेंडूर गावाशी जुना ऋणानुबंध आहे. सिद्धगिरी हॉस्पिटलच्या स्थापनेपासून आम्ही ग्रामस्थ नेहमीच सहकार्य करीत आहोत तसेच भविष्यात हि ते कायम राहील ” असे अभिवचन त्यांनी दिले. त्यांच्या सह माजी सरपंच यशवंत सुतार, बंडोपंत भांडवले, युवराज तीरुके यांनी सिद्धगिरी हॉस्पिटलचे जेष्ठ कॅन्सर तज्ञ डॉ. वसंत पै यांचा शाल – श्रीफळ देऊन सत्कार केला. तसेच डॉ. वीरेंद्र वणकुंद्रे, सह डॉ. स्वप्नील जाधव, डॉ. स्वप्नील वळीवडे यांचा पुष्प गुच्छ देऊन स्वागत केले.
जेष्ठ कॅन्सर तज्ञ डॉ. वसंत पै यांनी मार्गदर्शन करतांना ग्रामीण भागातही तोंडाच्या कॅन्सरचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. हि चिंताजनक बाब आहे असे नमूद करत युवा पिढीने व्यसनापासून दूर राहण्याचे आहवान केले तसेच स्क्रीन द्वारे विविध कॅन्सरच्या रोगांची नेमकेपणे माहिती दिली.
यावेळी सिद्धगिरी हॉस्पिटल च्या एच.आर. प्रमुख सौ. प्रित्ती पवार यांनी सिद्धगिरी हॉस्पिटल मधील विविध विभागांची तसेच महाराष्ट्र आणि कर्नाटक सरकारच्या सुरु असलेल्या योजनांची माहिती दिली. तसेच प्रदीर्घ काळ शासकीय वैद्यकीय सेवेचा अनुभव असलेले डॉ. प्रवीण नाईक हे सध्या वैद्यकीय अधिक्षक पदाची जबाबदारी पार पाडत असून त्यांच्या अनुभवाद्वारे सिद्धगिरी हॉस्पिटल अधिक व्यापकतेने व गतिमानतेने कार्यरत आहे, त्याचा लाभ घेण्याचे आहवान केले.
सिद्धगिरी हॉस्पिटला रोटरी क्लबने देणगी दिलेल्या अत्याधुनिक फिरत्या वातानुकुलीत गाडीमध्ये डोळे तपासणी करण्यात आली. या मध्ये मोतीबिंदूचे २२ रुग्ण आढळून आले. त्यांच्यावर आवश्यकतेनुसार सिद्धगिरी हॉस्पिटल मध्ये शासकीय योजनेतून ऑपरेशन्स करण्यात येणार असल्याचे नेत्रतज्ञ डॉ. वीरेंद्र वणकुंद्रे यांनी सागितले.
दिवस भर सुरु असलेल्या या शिबिराच्या नियोजनासाठी स्थानिक नागरिक गणपती सुतार, हनुमंत बोरके , साताप्पा शेवडे, आनंदा पोवार यांच्या सह सिद्धगिरी हॉस्पिटलच्या जनसंपर्क विभागाचे राजेंद्र मकोटे, कृष्णा वाळके यांनी विशेष परिश्रम घेतले.
Leave a Reply