
कोल्हापूर: महिलांसाठी वाचनालय सुरू करणं ही काळाची गरज होती. पुस्तकांमुळं व्यक्तीमत्व विकास होतो. आपली भाषा- देहबोली, मन सुसंस्कारीत असेल, तर जग निश्चितच महिलांचा सन्मान करेल, असं प्रतिपादन प्राचार्या मंगला बडदारे-पाटील यांनी केलं. भागीरथी महिला संस्थेच्या वतीनं महिला दिनाचं औचित्य साधून, जिल्हयात ११ ठिकाणी वाचनालयाचा शुभारंभ करण्यात आला. शाहू स्मारक भवन इथं या निमित्त झालेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. तर विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्या युवती आणि महिलांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
वाचनाची चळवळ अधिक वाढावी, विशेषत: ग्रामीण भागातील महिलांना वाचनाची आवड निर्माण व्हावी, आणि वाचन संस्कृतीचा प्रचार- प्रसार व्हावा, या हेतुनं भागीरथी महिला संस्थेच्या वतीनं कोल्हापूर जिल्हयात भागीरथी वाचनालयाची सुरवात करण्यात आली. आज महिला दिनाचं औचित्य साधून शाहू स्मारक भवन मध्ये समारंभपूर्वक तब्बल ११ ठिकाणी भागीरथी वाचनालयाचा शुभारंभ झाला. भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौ. अरूंधती महाडिक, प्राचार्या मंगला बडदारे- पाटील, लेखिका सोनाली नवांगुळ, ग्रिष्मा महाडिक, शिल्पा देगावकर, नगरसेविका रूपाराणी निकम, दिग्वीजय घोरपडे, विशाल कुमठेकर यांच्या उपस्थितीत रोपाला पाणी घालून कार्यक्रमाला सुरवात झाली. सौ. अरूंधती महाडिक यांनी, उपस्थितांचं स्वागत करून या उपक्रमाविषयी माहिती दिली. पुस्तकं जगण्याला दिशा देतात. महिलांमध्ये वाचन संस्कृती रूजावी, यासाठी सुरू केेलेल्या उपक्रमाला जिल्हयातून भरघोस प्रतिसाद मिळाल्याचं अरूंधती महाडिक यांनी सांगितलं. सुरवातीला भागीरथी महिला संस्थेनं स्वखर्चानं ११ वाचनालयासाठी पुस्तकं जमा केली आणि त्यानंतर समाजातील व्यक्ती संस्थांना पुस्तकं भेट देण्याचं आवाहन केलं. त्यातून अल्पावधीतच संस्थेकडं १४०० हून अधिक पुस्तकं जमा केली आहेत. संस्थेची मुळ पुस्तकं आणि जमा झालेली पुस्तकं यातून महिला दिनाच्या मुहूर्तावर ११ वाचनालयं सुरू करत असल्याचं त्या म्हणाल्या. भविष्यात ५० वाचनालयं सुरू करण्याचा आपला मानस आहे. तसंच वाचनालय चालवणार्या महिलांना मार्गदर्शन आणि प्रशिक्षण देण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं. वाचनालय सुरू झाल्यानंतर दर १० ते १५ दिवसानंतर पुस्तकांचं अंतरंग या विषयावर सामुदायिक चर्चा घडवण्यात येणार आहे. तसंच निबंध, काव्यवाचन यातून वाचन संस्कृती बळकट करण्यासाठी प्रयत्न केले जातील असं त्यांनी सांगितलं. हेल्मेटच्या वापराबाबत सर्वच स्तरावर जनजागृती झाली पाहिजे. त्यासाठी मिशन हेल्मेट उपक्रम सुरू केल्याचं सौ. महाडिक यांनी सांगितलं. त्यानंतर संचालिका रूपाराणी निकम यांनी मुक्त संवाद साधला. जाचक बंधनं, रूढी स्त्रीयांनीच तोडाव्यात, स्वत:चं महत्व ओळखावं, आपल्या आवड-निवडीला व्यवसाय बनवून सक्षम आणि समर्थ बनावं, असं त्यांनी आवाहन केलं. संचालिका शिल्पा देगावकर यांनी, उपस्थितांना हेल्मेट वापरासंबंधी शपथ दिली. त्यानंतर प्राचार्या मंगला पाटील- बडदारे यांनी, ग्रामीण भागात वाचनालय सुरू करणं ही काळाची गरज होती असं सांगून, महिलांनी महिलांचा सन्मान केला पाहिजे. वाचनातून आपली ज्ञानाची कवाडं खुली केली पाहिजेत असं सांगून, पुस्तकं ही जगण्याची उर्मी असतात, असं नमुद केलं. त्यानंतर लेखिका सोनाली नवांगुळ हिनं, साध्या – सोप्या पण ओघवत्या भाषेत जणू मुक्त चिंतन केलं महिलांची प्रचलित जीवन पध्दती, स्त्री-पुरूष संबंधाबाबत समाजाचा असलेला दृष्टीकोन, राजकारणातील महिलांची सद्यस्थिती अशा विषयांवर सोनाली नवांगुळ यांनी परखड विश्लेषण केलं. महिला दिन म्हणजे पुरूषांशी स्पर्धा नव्हे किंवा मिरवायचा दिवस नव्हे, अशा परखड शब्दात सोनाली नवांगुळ यांनी महिला दिनाची संकल्पना विषद केली. स्त्री आणि पुरूष एकमेकांशिवाय अपूर्ण आहेत. या संबंधांमध्ये मोकळीकता असावी, स्त्रीनं तिचं भावविश्व ओळखून स्वतंत्र रहावं, प्रत्येक माणसाच्या वैचारिक भुमिकेचा मान राखला पाहिजे, असं ठाम मत नवांगुळ यांनी व्यक्त केलं. त्यानंतर मिशन हेल्मेट अंतर्गत तयार केलेली नाटिका स्क्रीनवर दाखवण्यात आली. तर संचालिका ग्रिष्मा महाडिक यांच्या हस्ते भागीरथी महिला संस्थेवर आधारीत गीताचं सादरीकरण करण्यात आलं. त्यानंतर विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणार्या महिलांना सन्मानित करण्यात आलं. यामध्ये न्यायाधिश पदी निवड झालेल्या प्रियांका पठाडे, शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या क्रीडापटू नलिनी डवर आणि दिव्यांग क्रीडापटू शुक्ला बिडकर, तसंच अजब पुस्तकालयाच्या वैष्णवी सुतार, नृत्य दिग्दर्शक दिपक बिडकर, त्यांचे सहकारी कलाकार, करवीरनगर वाचन मंदिरच्या ग्रंथपाल मनिषा शेणई यांचा विशेष सत्कार करण्यात आला. त्यानंतर केर्ले, रूईकर कॉलनी, कनाननगर, संभाजीनगर, गारगोटी, वडकशिवाले, सांगरूळ, सडोली दुमाला, कसबा बीड, वाकरे, कागल अशा ११ वाचनालयांच्या प्रतिनिधींना पुस्तकं प्रदान करण्यात आली. या कार्यक्रमाला संचालक चारूदत्त जोशी, प्रभा भागवत, माजी महापौर सई खराडे, मनिषा जाधव, जिग्ना वसा, अवनी शेठ, तेजस्वीनी घोरपडे, सविता शिंदे, डॉ. प्रिया दंडगे, सुवर्णा गांधी यांच्यासह आजी-माजी नगरसेविका, विविध संस्थांच्या महिला पदाधिकारी आणि भागीरथी संस्थेच्या सभासद मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या.
Leave a Reply