नितीन देसाईंचे बॉलीवूड थीमपार्क झाले लोकांसाठी खुले 

 

८ मार्च म्हणजेच जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने, आधुनिक युगाचा विश्वकर्मा म्हणून नावाजलेले कर्तुत्ववान कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांच्या कर्जत येथील एन. डी. स्टुडीयोत अनोख्या ढंगात महिला दिन साजरा करण्यात आला. नितीन चंद्रकांत देसाई यांच्या संकल्पनेतून एन. डी. स्टुडीयोत साकार झालेल्या अखंड बॉलीवूडचा नजराणा याची देहि याची डोळा पाहण्याचा रंजक अनुभव महिलांनी घेतला. एन.डी. फिल्म वर्ल्डच्या अंतर्गत, एन.डी. स्टुडियोच्या भव्यदिव्य आवारात उभारण्यात आलेल्या या मायानगरीत, मराठी अभिनेत्री मानसी नाईकने बॉलीवूडच्या ‘चांदणी’ श्रीदेवी यांच्या गाण्यांवर नृत्य करत त्यांना अनोखी श्रद्धांजली वाहिली. भारतीय चित्रपटसृष्टीचा अखंड शृंगार ल्यालेला हा बॉलीवूड थीमपार्क आता प्रेक्षकांसाठी खुले करण्यात आले आहे. महिला दिनाचे औचित्य साधत लोकांसमोर सादर झालेली हि फिल्मीदुनिया सिनेचाहत्यांसाठी पर्वणी ठरणार आहे. कारण, आपल्या लाडक्या अभिनेत्यांचे सिनेमे, त्यांचे संवाद आणि अॅक्शन त्यांना जगता येणार आहे. 

कर्जतच्या हजारो ग्रामीण महिलांनी या महफिल्मोत्सवाला चांगला प्रतिसाद दिला, मनोरंजन विश्वापासून दूर असलेल्या ग्रामीण महिलांना, बॉलीवूड थीमपार्कची सफर यावेळी एन. डी. स्टुडीयोत करण्यात आली.  नितीन चंद्रकात देसाई यांच्या संकल्पनेतून साकार झालेली भारतातील हि पहिलीच भव्यदिव्य फिल्मीदुनिया ठरत असून, केवळ हिंदी किंवा मराठीच नव्हे तर संपूर्ण भारतीय चित्रपटसृष्टीचा प्रवास या महाफिल्मोत्सवामध्ये अनुभवता येणार आहे. 

कृष्णधवल ते रंगीत अशी भारतीय चित्रपटसृष्टीच्या दीर्घ प्रवासाची  सफर यात घडून येणार असून, फिल्मी परेडचा रोमांचदेखील प्रेक्षकांना अनुभवता येईल. तसेच या बॉलीवूड थीमपार्कात ऐतिहासिक चित्रपटासाठी उभारण्यात आलेले राजवाडे, गड-किल्ल्यांचे सेट्स तसेच अलिशान बंगले आहेत, ज्यात प्रेक्षकांना वावरतादेखील येणार असल्यामुळे,  सिनेमातील जग आणि त्यातील पात्र तसेच बाजारपेठाची रंजक सफर करण्याची नामी संधी यात मिळणार आहे. या महाफिल्मोत्सवामध्ये सिनेमातील स्टंट, नाचगाणी तसेच अॅक्शनपटात सिनेरसिकाना स्वतः सहभाग घेता येणार आहे.

सिनेमातील पात्रांचा पेहराव आणि मेक-अप करण्याची संधी यात असून, आपल्या आवडत्या सिनेमात प्रेक्षक म्हणून नव्हे तर एक कलाकार म्हणून वावरण्याची मुभा यात प्रेक्षकांना देण्यात आली आहे. तसेच, या फिल्मोत्सवात उदयोन्मुख कलाकारांसाठी मुक्त व्यासपीठ उभारले जाणार असून, याची दखल बॉलीवूडचे दिग्गज दिग्दर्शक आणि निर्मात्यांकडून घेतली जाणर आहे.  फिल्मी डान्स, सिंगिंग, कॉमेडी आणि खाओ जितो मुकद्दर का सिकंदर यांसारखे टेलेंट शो देखील यात असून, फिल्मोत्सवातील प्रत्येक सेक्शनमध्ये होणाऱ्या लाईव्ह प्रात्यक्षिकांमध्ये सिनेरसिकांना सहभागी होता येणार आहे. शिवाय खवय्यांसाठी शोलेतील असरानींच्या जेलमध्ये विविध प्रकारच्या स्वादिष्ट पदार्थांची चंगळसुध्दा आहे, त्यामुळे एन. डी. स्टुडीयोच्या या स्वप्नवतनगरीत येणाऱ्या प्रत्येक माणसांच्या गरजेचा आणि मानसिकतेचा योग्य विचार करण्यात आला असल्याचे दिसून येते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!