
कोल्हापूर : शेती आणि शेतकरी यांच्याशी संबंधित विविध प्रश्न सोडविण्यासाठी शासन प्रयत्नशिल असून शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी व सेंद्रीय शेतीसाठी कणेरीवाडी येथील सिध्दगिरी मठाच्या माध्यमातून करण्यात येत असलेले वेगवेगळे प्रयोग अत्यंत उल्लेखनीय आहेत, असे सांगून सिध्दगिरी हरितगृह प्रकल्प शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. या प्रकल्पास सर्वोत्तपरी सहाय्य करण्यात येईल, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.
कणेरीवाडी येथील सिध्दगिरी संस्थानच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या सिध्दगिरी हरीतगृह प्रकल्पाचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी सिध्दगिरी संस्थानचे आदृश्य काडसिध्देश्वर स्वामी, सह धर्मादाय आयुक्त आर.एस.चव्हाण, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी बसवराज मास्तोळी, गोकूळचे संचालक बाबा देसाई, कणेरीमठाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आर.डी. शिंदे, ट्रस्टी उदय सावंत, तानाजी निकम आदींची प्रमुख उपस्थिती होती.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, सिध्दगिरी संस्थानतर्फे राबविण्यात येत असलेल्या विविध कृषि प्रयोगांच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या अनेक प्रश्नांची उत्तर सापडलतील. शेतीचे क्षेत्रफळ कितीही कमी असले तरी त्याचे व्यवस्थीत नियोजनाद्वारे उत्पादन घेतल्यास शेतकऱ्याला त्यातून पुष्कळ नफा मिळवून तो श्रीमंत होऊ शकतो. या ठिकाणी पिकविण्यात येत असलेल्या शेती मालाचे चांगले मार्केटींग होणे अत्यंत आवश्यक असल्याची गरजही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
सध्या सिध्दगिरी हरितगृह प्रकल्पाच्या माध्यमातून परिसरातील 14 शेतकऱ्यांना 50 टक्के सबसिडी देवून हरितगृह देण्यात आले आहे. दरमहा शेतकऱ्याला 15 ते 20 हजार रुपये नफा होईल, या पध्दतीने नियोजन करण्यात येत आहे. हरितगृहासाठी स्वत:ची किमान 5 गुंठे जमीन, पाणी व विद्युत व्यवस्था असणे आवश्यक आहे. यावर्षी हा प्रयोग यशस्वी झाल्यास पुढील वर्षी सिध्दगिरी हरितगृह प्रकल्पांतर्गत 1400 शेतकऱ्यांना हरितगृह देण्यात येईल व त्यानी उत्पादीत केलेल्या शेती मालाची विक्रीही करण्यात येईल, असे यावेळी सांगण्यात आले.
यावेळी सिध्दगिरी आरोग्य धाम येथे भेट देवून महाराष्ट्र शासनाच्या महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजना तसेच कर्नाटक शासनाच्या वाजपेयी आरोग्य श्री योजनेंतर्गत डायलेसिस विभागाचा शुभारंभ पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते करण्यात आला.
Leave a Reply