भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौ. अरुंधती महाडिक यांना  सुपर वुमन पुरस्कार प्रदान

 
ठाणे: भागीरथी संस्थेच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणासाठी नियोजनबद्ध आणि प्रभावी  काम केल्याबद्दल तसेच खासदार धनंजय महाडिक यांच्याबरोबरीने सामाजिक, राजकीय उपक्रमात योगदान दिल्याबद्दल, अमृतवेल लाईफ स्टाईल मंचच्यावतीने, सौ. अरूंधती महाडिक यांना नुकताच सुपर वुमन पुरस्कार प्रदान करण्यात आला. ठाण्यातील गडकरी रंगायतन नाट्यगृहात नुकताच हा शानदार सोहळा संपन्न झाला. 
   अमृतवेल फाऊंडेशन आणि अमृतवेल मीडिया ग्रुप यांच्यावतीने दिल्या जाणार्‍या राज्यस्तरीय अमृतवेल सुपर वुमन पुरस्काराने, भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौ. अरुंधती धनंजय महाडीक यांना सन्मानित करण्यात आले. ठाणे इथल्या रामगणेश गडकरी सभागृहात हा दिमाखदार सोहळा नुकताच संपन्न झाला. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने अमृतवेल समुहाच्यावतीने दरवर्षी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. अर्थकारण, समाजकारण, उद्योग, व्यवसाय आणि प्रशासनामध्ये नाविन्यपूर्ण आणि लोकाभिमुख काम करणार्‍या कर्तृत्ववान महिलांना पुरस्कार देवून सन्मानित करण्यात येते. यावर्षी कोल्हापूरातील भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा अरुधंती महाडीक यांना महिला सक्षमीकरणाच्या क्षेत्रातील उत्तुंग कामगिरीबद्दल पुरस्कार देण्यात आला. नॅशनल रूरल लिव्हहूडच्या अध्यक्षा आर विमला यांच्या हस्ते ‘अमृतवेल सुपर वुमन’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी ज्येेष्ठ संपादक कुमूद चावरे, ठाण्याच्या निवासी उपजिल्हाधिकारी वंदना सुर्यवंशी, राज्य कर उपायुक्त माधवी सुर्यवंशी, अमृतवेलचे व्यवस्थापकीय संपादक धर्मेंद्र पवार उपस्थित होते. अरुधंती महाडीक यांनी भागीरथी महिला संस्था आणि भागीरथी युवती मंचच्या माध्यमातून महिला आणि मुलींच्या सर्वांगिण विकासाचे काम केले आहे. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि स्वावलंबी बनविण्यासाठी अनेक उपक्रम राबवले आहेत. ग्रामीण भागातील निरक्षर आणि निराधार महिलांना शेळी पालनाच्या माध्यमातून उपजीवीकेचे साधन उपलब्ध करून दिले आहे. शिवाय विविध स्पर्धांच्या माध्यमातून महिलांच्या कलागुणांना मंच उपलब्ध करुन दिलाय. या समाजाभिमुख कार्याची दखल अमृतवेलने घेतली आहे. महाडिक यांच्याबरोबरच पोलिस उपनिरीक्षक ज्योती देशमुख, उद्योग विभागाच्या व्यवस्थापिका हसिना मुजावर, सांगलीच्या मेघना कोरे, ठाणे इथल्या लिना कोरे, नवी मुंबईतील कांचन  चव्हाण, ठाण्यातील रूपाली भारद्वाज यांनाही सन्मानित करण्यात आले. यावेळी अमृतवेलचे कोल्हापूर प्रतिनिधी अमोल निरगुंडे यांच्यासह महिला, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!