

ग्रामीण भागामध्ये अनेक कुटुंबांना आजही उदरनिर्वाहाचं साधन उपलब्ध नाही. रोजगाराअभावी अनेक कुटुंबांची फरफट होतीय. या कुटुंबांना दोनवेळची भाजीभाकरी सुखानं खाता यावी, या हेतूनं भागीरथी महिला संस्थेनं, मोफत शेळी वाटप उपक्रम सुरु केलाय. या उपक्रमांतर्गत गरीब आणि गरजू कुटुंबांना मोफत शेळी देण्यात येते. या शेळीच्या पालनपोषणातून त्या कुटुंबाला रोजगाराची संधी उपलब्ध होते. शेळीला पिल्लं झाल्यानंतर त्यातील एक पिल्लू संस्थेला देवून, उर्वरित पिल्लं आणि शेळी ते कुटुंब ठेवून घेतं. भागीरथी संस्थेला मिळालेलं पिल्लू मोठं झाल्यानंतर, ते आणखी एका गरजू कुटुंबाला देण्यात येतं. अशाप्रकारे या उपक्रमाद्वारे जिल्ह्यातील शेकडो कुटुंबांना उदरनिर्वाहाचं साधन उपलब्ध झालंय. आजरा तालुक्यातील चांदेवाडी इथंही भागीरथी महिला संस्थेच्यावतीनं शेळी वाटप उपक्रम पार पडला. ५ कुटुंबांना भागीरथीच्या अध्यक्षा सौ. अरुंधती महाडिक यांच्या हस्ते शेळ्या प्रदान करण्यात आल्या. हा शेळीवाटप उपक्रम जिल्ह्याला पथदर्शी ठरावा, यासाठी भागीरथीचे प्रयत्न सुरु आहेत. भविष्यात जिल्ह्यात एकही कुटुंब आर्थिक टंचाईमुळं उपाशी झोपू नये, असा भागीरथीचा प्रयत्न असल्याचं सौ. अरुंधती महाडिक यांनी सांगितलं. चांदेवाडीचे सरपंच लक्ष्मण सावंत, ग्रामसेविका कांचन चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केलं. शेळीचं संगोपन करुन, त्यातून नफा कसा मिळवावा, याबाबत डॉ. एस. आर. ढेकळे यांनी मार्गदर्शन केलं. या कार्यक्रमाला उपसरपंच संगीता गिलबिले, ग्रामपंचायत सदस्य अनिल हसबे, वंदना कुंभार, सुप्रियां कोंडुसकर, चंद्रकला सिद्धनेर्ली यांच्यासह बचत गटाच्या महिला, युवाशक्तीचे पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते.
Leave a Reply