
कागल: ढोल, ताशा, लेझीम,झांज पथकाच्या निनादात व फुलांचा वर्षावात जिल्ह्याचे नेते व कागल तालुक्याचे आमदार हसन मुश्रीफ यांच्या रामनवमी दिवशी साजऱ्या झालेल्या वाढदिवसाला राज्यातून आलेल्या हजारो कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला. शहराला दिवसभर उरुसाचे स्वरूप आले. सकाळी आमदार मुश्रीफ यांच्या आगमनावेळी प्रमुख मार्गांवरून फुलांचा वर्षाव करण्यात आला. दुपारी दोन वाजेपर्यंत गैबी चौकात थांबून त्यांनी शुभेच्छा स्वीकारल्या. त्यानंतर गडहिंग्लज आणि उत्तर येथे जाऊन तेथील कार्यकर्त्यांच्या व मान्यवरांच्या शुभेच्छा स्वीकारल्या. पुन्हा कागल येथे सायंकाळी समस्त ग्रामस्थ यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. आमदार मुश्रीफ यांनी सकाळी लक्ष्मी देवालयांत जाऊन दर्शन घेतले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळा व गरीबी चौकापर्यंत सर्व पुतळ्यांना पुष्पहार घालून अभिवादन केले. अक्षरधाम धर्तीवर बांधलेले राम मंदिर येथे जाऊन श्रीरामाची पूजा केली. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने, नगराध्यक्षा माणिक माळी, प्रकाश गाडेकर, रमेश माळी उपनगराध्यक्ष प्रवीण काळभोर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. गैबी चौकाकडे मिरवणुकीने जात असताना आमदार मुश्रीफ यांच्यावर कोल्हापूर वेस ते ठिकठिकाणी फुलांचा वर्षाव करण्यात आला. मार्गावर काही ठिकाणी आकर्षक रांगोळी काढली होती. आमदार मुश्रीफ यांना शुभेच्छा देण्यासाठी येणाऱ्यांना मौजे सांगावच्या पाटील बंधूंनी उसाच्या रसाची मोफत सोय केली होती. तसेच गैबी हॉलमध्ये दुधाची सोय करण्यात आली होती. कोल्हापूर वेशीजवळ सरबत आणि कोल्ड्रिंकची मोफत सोय केली होती. राम मंदिर जवळ कोष्टी गल्लीच्या वतीने महाप्रसाद वाटप करण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांनी शक्तिप्रदर्शन केले. फटाक्याची आतषबाजी करण्यात आली. आमदार मुश्रीफ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी अंध, अपंग ,वृद्ध निराधार, लहान बालके यांच्यासह समाजातील सर्व स्तरातील लोक नागरिक,पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. कोल्हापुरातील मुस्लिम बोर्डिंगच्या वतीने मोफत फळवाटप करण्यात आले. यावेळी खासदार धनंजय महाडिक, आमदार सतेज पाटील, माजी आमदार पी. एन. पाटील प्रकाश आवाडे, निवेदिता माने महापौर स्वाती येवलुजे,राजेंद्र पाटील-यड्रावकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए. वाय पाटील, प्रवीणसिंह पाटील, वीरेंद्रसिंह मंडलिक, प्रकाश पाटील, राजू लाटकर, बीद्रीचे संचालक व कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Leave a Reply