
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाने शासनाचे निर्देशानुसार काम करणे गरजेचे आहे. वर्षानुवर्षे मंजूर झालेला निधी, योजना प्रलंबित राहतात. योजना व निधी मंजूर करण्यासाठी लोकप्रतिनिधी जीवाचे रान करतात पण, योजनेचे कंत्राटदार कामात हलगर्जीपणा करतात आणि योजना रखडली जाते. याचे उत्तर लोकप्रतिनिधींना जनतेस द्यावे लागते. अशा प्रलंबित योजना, रस्त्यावरील खड्डे यामुळे राज्यात कोल्हापूरची बदनामी होत आहे. कंत्राटदार दिलेल्या मुदतीत काम करत नसतील, हलगर्जीपणा करत असतील तर त्यांना काळ्या यादीत टाका. लोकांचे जीव जाण्यापर्यंत रस्त्यावरील खड्यांवर महापालिका प्रशासन उपाययोजना करत नाही, महापालिकेचे विभागीय कार्यालयांचे याकडे साफ दुर्लक्ष आहे. मंजूर असलेल्या निधीबाबत प्रसिद्धी माध्यमाना अधिकारी चुकीची माहिती देतात. शहराच्या विकासाकडे अधिकाऱ्यांचे लक्ष नाही. हा भोंगळ कारभार तात्काळ सुधारावा. शहरातील धोकादायक खड्डे दोन दिवसात मुजवा, अन्यथा गय केली जाणार नाही, असे निर्देश राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी दिले. शहरातील धोकादायक खड्डे, नगरोत्थान निधी याबाबत राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली कोल्हापूर महानगरपालिका अधिकारी व कोल्हापूर जिल्हा व शहर नागरी कृती समिती पदाधिकारी यांची संयुक्तिक बैठक शिवालय, शिवसेना जिल्हा मध्यवर्ती कार्यालय, शनिवार पेठ, कोल्हापूर येथे पार पडली.
बैठकीच्या सुरवातीस कृती समितीच्या वतीने भूमिका मांडताना मा.महापौर आर.के.पोवार यांनी, रस्त्यावरील खड्डे मुजविन्यासाठी तात्काळ निधी उपलब्ध केला आहे काय? जिथे जास्त रहदारी आहे अशा प्रमुख ठिकाणचे रस्ते तात्काळ पूर्ण करणे गरजेचे आहे. यासह सुरु असलेल्या पॅचवर्कचा दर्जा योग्य नसल्याने रस्ता दुरुस्त केल्या केल्या उखडला जात आहे. शहरात सर्वत्र अशी परिस्थिती असल्याने कोल्हापूरची “खड्डेपूर” अशी बदनामी अखंड महाराष्ट्र राज्यात होत आहे. याकडे कृती समिती वेळोवेळी प्रशासनाकडे पाठपुरावा करत आहे. प्रशासनाच्या शब्दाला मान देवून आंदोलन स्थगित केले आहे. पण खड्डे मुजविण्यासाठी करण्यात येणाऱ्या पॅचवर्कचा दर्जा योग्य नसल्याने पुन्हा कृती समिती यावर आवाज उठवत असल्याचे सांगितले.
यावेळी माहिती देताना शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत यांनी, रस्त्याच्या पॅचवर्क करिता तात्काळ ८९ लाख रुपयांचा निधी मंजूर केला असून, पॅचवर्कचे काम सुरु आहे. येत्या दहा दिवसात शहरातील पूर्ण रस्त्यांचे पॅचवर्कचा पूर्ण होईल असे सांगितले.यावेळी अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत, हर्षजीत घाटगे, नगररचना विभागाचे श्री.मस्कर, कृती समितीचे मा.नगरसेवक बाबा पार्टे, अशोक भंडारे, सुभाष देसाई, विवेक कोरडे, प्रकाश घाटगे, शिवसेना उप-जिल्हाप्रमुख किशोर घाटगे, उदय भोसले, तुकाराम साळोखे आदी उपस्थित होते.
Leave a Reply