
कोल्हापूर : राज्य निवडणूक आयोगाकडून प्रदीर्घ प्रतीक्षेत असलेल्या राज्यातील ७७५० ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर करण्यात आल्या आहेत. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील ४७५ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी रंगणार आहे. राज्यातील सत्तांतरानंतर प्रथमच मोठी निवडणूक गावपातळीवर पार पडणार आहे. “बाळासाहेबांची शिवसेना” पक्षाचे वलय आणि लोकप्रियता जिल्ह्यात वाढत असून, आगामी ग्रामपंचायतीच्या निवडणुका संपूर्ण ताकदीनिशी लढणार असल्याचे प्रतिपादन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी केले. शिवालय, शिवसेना जिल्हा मध्यवर्ती कार्यालय, शनिवार पेठ, कोल्हापूर येथे ग्रामपंचायत निवडणुकांसंदर्भात शिवसेनेच्या कोअर कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत आगामी सर्वच निवडणुका संपूर्ण ताकदीनिशी लढवून, जिल्ह्यात बाळासाहेबांची शिवसेना एक नंबरचा पक्ष ठरेल, अशा पद्धतीने काम करण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला.
बैठकीच्या सुरवातीस बोलताना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण यांनी, ग्रामपंचायती निवडणुका लढविण्याचा सर्वांना अनुभव आहे. पक्षात जेष्ठ आणि युवा पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. जेष्ठ पदाधिकाऱ्यांच्या अनुभवाचा नवनियुक्त पदाधिकारी यांनी संघटना वाढीसाठी प्रयत्न करावा. गावपातळीवर पदाधिकारी, शाखा यांच्या नियुक्त्या होणे गरजेचे आहे. याचा आढावा उपजिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख यांनी घेवून लवकरात लवकर या नियुक्त्या पूर्ण करून घ्याव्यात. यासह सभासद नोंदणी अभियानाचेही आयोजन गावपातळीवर करण्याच्या सूचना दिल्या.
बाळासाहेबांची शिवसेना राज्यात आगामी सर्व निवडणुका संपूर्ण ताकदीनिशी लढणार आहे. आदेशाने जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यात विविध पदांवर पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री आपल्या पक्षाचे असल्याने विकास कामे आणि राज्य शासनाचे जनहिताचे निर्णय या जोरावर मतदारापर्यंत पोहचण्याचा मार्ग तयार होणार आहे. तत्पर्वी नियुक्त केलेल्या पदाधिकाऱ्यांनी आपली जबाबदारी ओळखून कामाला लागणे गरजेचे आहे. प्राथमिक स्वरूपात शिवसेनेचा संपर्क असलेल्या ग्रामपंचायतींमध्ये चाचपणी करावी. अशा गावातील इच्छुक उमेदवारांशी संपर्क करावा. इच्छुक उमेदवारांच्या लोकप्रियतेसह त्यांच्या सामाजिक व विकासात्मक कामाचाही आढावा घेण्यात यावा. गावपातळीवर पोहचणे गरजेचे असल्याने जिल्हाप्रमुखांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांच्या कमिट्या स्थापन कराव्यात. या कमिट्यांच्या माध्यमातून गावा-गावात दौरे करून जनसंपर्कावर भर द्यावा. या ग्रामपंचायत निवडणुकांवर पुढील महापालिका, विधानसभा निवडणुका अवलंबून असल्याने, प्रत्येकाने आपली जबाबदारी चोखपणे पार पाडावी. यासह ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच पद लोकनियुक्त असल्याने सरपंच पदाच्या उमेदवारांवरही लक्ष केंद्रित करावे. आगामी ग्रामपंचायत निवडणुकाच्या दृष्टीने गावपातळीवर चाचपणी करून त्याचा अहवाल दोन – तीन दिवसात सादर करावा. सर्वसमावेशक जबाबदाऱ्या वाटून घेवून आगामी निवडणुकीत बाळासाहेबांच्या शिवसेनेचा भगवा झेंडा डौलाने फडकविण्यासाठी सज्ज व्हा, अशा सूचनाही यावेळी केल्या.
Leave a Reply