
कोल्हापूर : कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या स्मारकाचे काम पूर्ण करण्यासाठी २८ लाखाच्या निधीची आवश्यकता आहे. यापैकी सुमारे १८ लाख रुपयांचा निधी महापालिका देणार असून उर्वरित निधी माजी मंत्री, आमदार सतेज पाटील, आमदार ऋतुराज पाटील व माझ्या निधीतून देण्यात येणार असल्याची माहिती आमदार जयश्री जाधव यांनी दिली.
प्रतिभानगर येथे उभारण्यात येणाऱ्या गोविंद पानसरे यांच्या स्मारकाचे बहुतांश काम पूर्ण झाले आहे; मात्र स्मारकाच्या परिसराचे सुशोभीकरण तसेच ग्रंथालय आणि इतर काही कामे अपूर्ण आहेत. या कामांची काल आमदार सतेज पाटील, आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयश्री जाधव यांनी पाहणी केली होती व उर्वरित काम एक महिन्यात पूर्ण करण्याच्या सूचना महापालिका प्रशासनास दिल्या होत्या. त्यानुसार उर्वरित कामांच्या नियोजनाकरिता महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्यासोबत आमदार जयश्री जाधव यांनी बैठक घेऊन कामाच्या आराखड्याबाबत चर्चा केली.
स्मारकाचे काम पूर्ण करण्याकरिता २८ लाखाच्या निधीची आवश्यकता आहे. यापैकी दहा लाख रुपयांचा निधी थेट स्मारकासाठी तर स्मारकाच्या विद्युत कामासाठी आठ लाख रुपयांचा निधी असा एकूण 18 लाख रुपयांचा निधी महापालिका देणार आहे. तर स्मारकाचे काम पूर्ण करण्यासाठी उर्वरित निधी मी, आमदार सतेज पाटील, आमदार ऋतुराज पाटील असे तिघे मिळून देणार असल्याची माहिती आमदार जयश्री जाधव यांनी दिली.
यावेळी कॉग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, माजी महापौर निलोफर आजरेकर, माजी उपमहापौर संजय मोहिते, माजी नगरसेवक शारंगधर देशमुख, आदिल फरास, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, सतीशचंद्र कांबळे आदी उपस्थित होते.
Leave a Reply