
कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील विविध प्रभागांमध्ये ड्रेनेजची समस्या निर्माण झालेली आहे. शहरात अनेक ठिकाणी भुयारी गटर योजना अस्तित्वात नसल्याने प्रामुख्याने शहरातील ई वॉर्ड, उपनगरे आदी परिसरातील सांडपाणी ओपन गटारीमधून नाल्यात मिसळत आहे. याचा दुष्परिणाम पंचगंगा नदी सह रंकाळा व शहरातील इतर प्रमुख तलावांच्या पाण्यावर होवून प्रदुषणात वाढ होत आहे. याकरिता शहरात भुयारी गटर योजना अस्तित्वात आणून शहरातील १०० % सांडपाण्यावर मलनिस्सारण प्रकिया करण्यासाठी आवश्यक प्रस्ताव तात्काळ तयार करून शासनाकडे सादर करावा. याचा शासन दरबारी पाठपुरावा करून निधी मंजुरीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी सांगितले. पंचगंगा नदी, रंकाळ्यासह इतर तलावांची प्रदूषण मुक्ती आणि शहरातील गंभीर ड्रेनेज लाईनच्या प्रश्नाबाबत शिवालय, शिवसेना जिल्हा मध्यवर्ती कार्यालय येथे आयोजित बैठकीत त्यांनी महापालिका अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.
यावेळी बोलताना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी, शहरातील बहुतांश ठिकाणी भुयारी गटर योजना अस्तित्वात नाही. त्यामुळे निर्माण होणारे सांडपाणी ओपन गटारीमधून नाल्यात आणि तलावात मिसळून प्रदुषणात वाढ होत आहे. अशा सांडपाणी मिश्रित सांडपाण्यामुळे रोगराई पसरून नागरिकांचे आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. यासह जलचरांच्या अस्तित्वाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. यावर तात्काळ उपाययोजना म्हणून कोल्हापूर महानगरपालिका हद्दीतील ड्रेनेज लाईनचा प्रभाग निहाय आढावा घेवून १०० % सांडपाण्यावर मलनिस्सारण प्रकिया करण्याच्या दृष्टीने आवश्यक प्रस्ताव तयार करून अमृत योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातून निधी मागणीचा प्रस्ताव शासनाकडे सादर करावा, अशा सूचना केल्या.
Leave a Reply