बेळगाव केंद्रशासित प्रदेश करा : आमदार हसन मुश्रीफ यांची नागपूर अधिवेशनात मागणी

 

कोल्हापूर : केंद्र सरकारने बेळगाव केंद्रशासित प्रदेश करावा. तसेच सीमाभागातील मराठी बांधवांच्यावरील अत्याचार तातडीने थांबवावेत, अशी जोरदार आणि आग्रही मागणी आमदार हसनसाहेब मुश्रीफ यांनी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात केली. आमदार श्री. मुश्रीफ यांच्या मागणीला सभागृहातील सर्वच आमदारांनी बाकी वाजवून समर्थन केले.यावेळी आमदार श्री. मुश्रीफ म्हणाले, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ कोल्हापुरात पंधरवड्यापूर्वी धरणे आंदोलनही झाले होते. त्यामध्ये सीमा भागातील लोकप्रतिनिधींनी मांडलेल्या कर्नाटक सरकारकडून होणाऱ्या अत्याचाराच्या घटना हृदय पिळवटून टाकणाऱ्या होत्या. 56 वर्ष हा लढा लढत असलेल्या त्यांच्या भावना होत्या. आम्ही मराठी भाषिक असूनही आम्हाला मराठी बोलू दिलं जात नाही. मराठी पाठ्या लावू दिले जात नाहीत. शेतीचे उतारेही कन्नड भाषेत आहेत. दरवर्षी शेतीच्या उताऱ्यामध्ये पाच-दहा-वीस गुंठे जमीन कमीच होते. परंतु कन्नड भाषेमुळे आम्हाला ते समजत नाही. त्यामुळे 19 डिसेंबरच्या बेळगाव मधील महामेळाव्याला येण्यासाठी त्यांनी आम्हाला निमंत्रण दिले होते. म्हणून आम्ही लोकशाही मार्गाने बेळगावला चाललो होतो. परंतु बेळगावमध्ये एकाही मराठी माणसाला घराबाहेर पडू दिलं नाही. हा अन्याय अजून कुठपर्यंत चालणार आहे असा रोखठोक सवालही त्यांनी विचारला. मंडप उकडून टाकला स्पीकर फेकून टाकला.

आमदार श्री. मुश्रीफ पुढे म्हणाले, सीमावासीयांची एकच भावना आहे. आम्ही मराठी भाषिक आहोत आमची भौगोलिक संलग्नता आहे. त्यामुळे 865 गावाने महाराष्ट्रात येण्याचे ठराव केले आहेत. तेथील ग्रामपंचायती देखील मराठी बांधवांच्या ताब्यात आहेत. आमदार, खासदार मराठी भाषिकांचे निवडून आलेले आहेत. या प्रश्नावर चांगली आणि तात्काळ चर्चा घेतली पाहिजे असा आग्रह श्री.मुश्रीफ यांनी धरला.आमदार श्री मुश्रीफ म्हणाले, माझ्या घरापासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर कर्नाटकची हद्द सुरू होते एकाही मराठी माणसाला घराबाहेर पडू दिले नाही.अलमट्टी धरणाचे उंची वाढवण्याचे धोरण कर्नाटक सरकारचे आहे त्यामुळे कोल्हापूर व सांगली हे दोन्ही जिल्हे बुडतील या प्रश्न सभागृहात लक्षवेधी मांडण्याचे श्री. मुश्रीफ यांनी सांगितले.

“संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे…..”
आमदार श्री. मुश्रीफ यांनी पांढरी गांधी टोपी परिधान केली होती. टोपीवर निपाणी, बेळगाव, कारवार, बिदर भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, ही घोषणा लक्षवेधी व ठळकपणे दिसत होती. हीच मागणी आपल्या भाषणात श्री. मुश्रीफ यांनी जोरदारपणे मांडली.
=================

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!