
कोल्हापूर: श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त कोल्हापूर जिल्हा व शहर राष्ट्रीय तालीम संघाच्या वतीने खासबाग येथे निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान भरवण्यात आले होते.यावेळी राष्ट्रवादीचे नेते खासदार शरद पवार यांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि चांदीची गदा देवून श्रीमंत शाहू महाराज यांचा सत्कार करण्यात आला. माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी.वाय. पाटील यांची कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती होती.राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या कार्याचा आणि विचारांचा वारसा संपूर्ण करवीरच्या जनतेबरोबरच महाराष्ट्रासोबत रहावा, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी श्रीमंत शाहू महाराज यांना शुभेच्छा दिल्या.श्रीमंत शाहू महाराजांचा अमृत महोत्सवी वाढदिवस एक लोकोत्सव म्हणून साजरा होत आहे. याचा आनंद आहे. शाहू महाराजांचा समतेचा विचार पुढे घेवून जाण्याचे काम ते करत आहे. तरुणांना एका समतेच्या विचाराने एकत्र ठेवण्याचं काम श्रीमंत शाहू महाराज छत्रपती सातत्याने करत आहेत. राजर्षी शाहू महाराज ज्या प्रमाणे जनतेत मिसळायचे तसेच श्रीमंत शाहू महाराज देखील जनतेत मिसळतात. त्यांचे काम आम्हा राजकारण्यांसाठी आदर्शवत आहे. त्यांना दीर्घायुष्य लाभो अशी सदिच्छा आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केली. आमदार हसन मुश्रीफ यांनी देखील श्रीमंत शाहू महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.यावेळी गोव्याचे माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे, खासदार श्रीनिवास पाटील, खासदार संजय मंडलिक, खासदार धनंजय महाडिक माजी खासदार संभाजीराजे छत्रपती, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, आमदार पी. एन. पाटील यांच्यासह जिल्ह्यातील आमदार, संग्रामसिंह भोसले, जनरल जे एस पल्लू यांच्यासह कला, क्रीडा, सांस्कृतिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवर व कुस्तीप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Leave a Reply