
कोल्हापूर : दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव (आण्णां) यांची नाळ फुटबॉलशी जोडलेली होती. त्यांच्या अकाली निधनानंतरही याची प्रचिती येत आहे. आण्णासाठी फुटबॉलचे संघ व खेळाडू कुटुंबप्रमाणे होते. प्रत्येकाच्या सुखदुःखात ते सहभागी असायचे. खेळाडूंना त्यांचा मोठा आधार होता. आण्णांचा वारसा आमदार जयश्री जाधव व सत्यजित जाधव समर्थपणे पुढे नेत असून, जाधव कुटुंबीय फुटबॉल संघाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. आजच्या कार्यक्रमामुळे आण्णा आमच्या सोबत आहेत अशी जाणीव होत असल्याचे भावोद्गार आमदार ऋतुराज पाटील यांनी व्यक्त केले.
कोल्हापूर शहरातील सोळा वरिष्ठ (सीनियर) फुटबॉल संघातील खेळाडूंना जाधव इंडस्ट्रीजतर्फे (गोकुळ शिरगाव एमआयडीसी) फुटबॉल किटचे वितरण दिमाखदार सोहळ्यात करण्यात आले.
फुटबॉलच्या मैदानावर एकमेकांच्या विरोधात खेळणारे सर्व खेळाडू आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्रित आले. या फुटबॉल संघाचे अध्यक्ष, पदाधिकारी, प्रशिक्षक, व्यवस्थापक आणि खेळाडू यांचा स्नेह मेळावा हॉटेल पॅव्हेलियन येथे पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात दिपप्रज्वलन व दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या प्रतिमेचे पुजनाने झाली.
आमदार ऋतुराज पाटील म्हणाले, कोल्हापूरच्या फुटबॉल आणि क्रीडा क्षेत्राचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे. कोल्हापूरचा फुटबॉल आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकला पाहिजे, यासाठी दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव (आण्णां) यांची नेहमी धडपड होती. विधिमंडळामध्ये जेथे संधी मिळेल तिथे आण्णा फुटबॉल विषयी आवर्जून बोलायचे. कोल्हापुरातील मैदानाच्या सर्वांगीण विकासासाठीचे प्रस्ताव आण्णांनी तयार करून घेतले आणि निधीसाठी मंत्रालयात पाठपुरावा करत होते. फुटबॉलच्या माध्यमातून कोल्हापूरच्या क्रीडा क्षेत्राच्या सर्वांगीण विकासाचे स्वप्न पाहणाऱ्या आण्णांच्या निधनाने क्रीडा क्षेत्राची झालेली हानी कधीही न भरून निघणारी आहे.आमदार जयंत आसगांवकर म्हणाले, अण्णांची खेळ आणि खेळाडूंच्या वरती प्रेम होते. त्यांच्या कार्याचा वारसा आमदार जयश्री जाधव वहिनी व सत्यजित जाधव समर्थपणे पुढे नेत आहेत याचा मनस्वी आनंद आहे.आमदार जयश्री जाधव म्हणाल्या, फुटबॉल म्हणजे अण्णांचा जीव की प्राण. फुटबॉल हा शब्द जरी कानावर पडला तरी आता अण्णांच्या आठवणीने डोळे पाणावतात. आण्णा गेले तेव्हा अनेकांनी कोल्हापूरचा फुटबॉल पोरका झाला अशा भावना व्यक्त केल्या होत्या. पण कोल्हापूरचा फुटबॉल कधीही पोरका होणार नाही. जाधव कुटूंबीय कायमपणे फुटबॉल संघ व खेळाडूच्या पाठिशी खंबीरपणे राहणार आहे. आजपर्यंत अण्णांनी ज्या प्रकारे फुटबॉल खेळाडू व संघांना मदतीचा हाच दिला, त्याचप्रमाणे आम्हीही सदैव आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू.युवा उद्योजक सत्यजित चंद्रकांत जाधव म्हणाले, स्पर्धेच्या निमित्ताने मैदानावर फुटबॉल संघातील इर्षा असावी, खेळाडूंनी खेळातील गुणवत्ता दाखवावी. मात्र जेव्हा विषय कोल्हापूरच्या फुटबॉलचा असेल तेव्हा सर्व संघाने एकत्रित आलेच पाहिजे. आपल्यातील हेवेदावे बाजूला ठेवून सर्व संघांनी फुटबॉलच्या विकासासाठी आणि कोल्हापूरचा फुटबॉल आंतरराष्ट्रीय स्तरावरती नेण्यासाठी कसोशीने प्रयत्न करावेत. जाधव इंडस्ट्रीज आणि जाधव कुटुंबीय नेहमीच फुटबॉलच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील.शिवसेनेचे शहरप्रमुख सुनिल मोदी म्हणाले, देशाच्या पटलावर फुटबॉल नेण्यासाठी आण्णा प्रयत्तशिल होते.दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्यानंतर 24 तास फुटबॉलचा विचार करणारा नेता कोणीही नाही.कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, शिवसेनेचे शहरप्रमुख सुनिल मोदी, माजी नगरसेवक संभाजी जाधव, जयश्री चंद्रकांत (आण्णा) जाधव फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. दश्मिता जाधव, माजी नगरसेवक सचिन पाटील, राष्ट्रीय खेळाडू अशकीन आजरेकर, बाळासाहेब नचिते, आशिष पवार, किरण अतिग्रे आदी उपस्थित होते.यावेळी श्री शिवाजी तरुण मंडळ, दिलबहार तालीम मंडळ, पाटाकडील तालीम मंडळ, बालगोपाल तालीम मंडळ, बी. जी. एम. स्पोर्टस्, प्रॅक्टीस फुटबॉल क्लब, संयुक्त जुना बुधवार पेठ, खंडोबा तालीम मंडळ, फुलेवाडी फुटबॉल क्रिडा मंडळ, कोल्हापूर पोलीस फुटबॉल संघ, ऋणमुक्तेश्वर तालीम मंडळ, झुंजार क्लब, सम्राटनगर स्पोर्ट्स, उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम मंडळ, रंकाळा तालीम मंडळ, संध्यामठ तरुण मंडळ या सोळा संघांना फुटबॉल किटचे वितरण करण्यात आले.
Leave a Reply