
कोल्हापूर: शहरातील अनेक शासकीय कार्यालयाच्या भिंती बकाल बनल्या आहेत. त्यामुळे शहर सौंदर्याला बाधा येत आहे. याबाबत कृष्णराज महाडिक यांनी महापालिकेच्या सहकार्याने अभिनव उपक्रम राबवला. चित्रकार आणि मुकबधीरांना सोेबत घेत, आज शहराचा मुख्य मार्ग असलेल्या स्टेशन रोडवरील रेल्वे स्टेशनची भिंत सुंदर निसर्ग चित्र रेखाटून बोलकी केली. यापुढेही शहरातील अनेक बकाल भिंतींचे रूप बदलणार असल्याचे कृष्णराज महाडिक यांनी सांगितले.कोल्हापूर शहरातील अनेक शासकीय भिंती बकाल झाल्याने शहराच्या सौंदर्याला बाधा येते. याबाबत कृष्णराज महाडिक यांनी पुढाकार घेत महापालिकेच्या प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे, उपायुक्त रविकांत अडसुळ यांची भेट घेवून स्टेशन रोडवरील पोस्ट ऑफिस नजीकची भिंत रंगवण्याबाबत मान्यता घेतली. या उपक्रमाला महापालिकेने पाठबळ दिले. महापालिकेच्यावतीने कर्मचारी बोलवून रंग आणि साहित्य देण्यात आले. दरम्यान कृष्णराज महाडिक यांनी स.म. लोहिया हायस्कूलमधील कर्णबधिर मुले आणि कोल्हापुरातील काही चित्रकारांना सोबत घेवून ही भिंत रंगवण्यास सुरूवात केली. ६० फुट लांबीच्या भिंतीवर चित्रकार आणि मुकबधिर कलाकारांनी आपल्या कलकुसरिने भिंतीचे रूप पालटले. निसर्गचित्र आणि भिंतीच्या मधोमध करवीर निवासिनी श्री अंबाबाईचे चित्र रेखाटले गेले आहे. सर्वांनी मिळून त्यात रंग भरण्यास सुरूवात केली. आणि तीन तासाच्या अथक परिश्रमानंतर या भिंतीचं रूपडे बदलले. या परिसरातील वाहनधारक, नागरिक, प्रवासी यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. अशा प्रकारचे उपक्रम यापुढेही निरंतर सुरू राहील्यास शहराच्या सौंदर्यात भर पडेल. तसेच मुकबधिर मुलांना चित्रांच्या माध्यमातून अशा सार्वजनिक ठिकाणी व्यक्त होता येईल, असे स.म. लोहिया मुकबधिर शाळेच्या शिक्षिका मंगेशी माने यांनी सांगितले. या उपक्रमाच्या ठिकाणी महापालिकेचे उपायुक्त रविकांत अडसुळ यांनी भेट दिली. त्यांनाही भिंतीवर चित्र रेखाटण्याचा मोह आवरला नाही. कृष्णराज महाडिक यांच्या साथीनं त्यांनी भिंतीवर चित्र रेखाटली. यावेळी विपुल हळदणकर, अजय काटाळे, सत्यजित मोहिते, प्रणव मोरे यांच्यासह मुकबधिर शाळेच्या अश्विनी कुलकर्णी आणि विद्यार्थी उपस्थित होते.
Leave a Reply