
कोल्हापूर:तळसंदे येथील डी वाय पाटील कृषी आणि तंत्र विद्यापीठात महाराष्ट्रातील पहिल्या ‘एन.एस.डी.सी. सेंटर फॉर फ्युचर स्किल्स’चे उद्घाटन राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नितीन कपूर व डी. वाय. पाटील एज्युकेशन सोसायटीच्या सल्लागार सौ. पुजा ऋतुराज पाटील यांच्या हस्ते झाले. नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (एन.एस.डी.सी.) आणि एथ्नोटेक अकॅडमी यांच्या सहकार्यातून सुरु झालेल्या या सेंटरमधून विविध आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे स्किल कोर्सेस विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार आहेत.जागतिक पातळीवर नामांकित संस्थांच्या सहकार्याने तळसंदे येथे सुरु झालेले हे सेंटर फॉर फ्युचर स्किल्स विद्यार्थ्यांच्या करिअरला नवा आयाम देईल. नवनवीन तंत्रज्ञान स्विकारा, सुरवात करा आणि सातत्य ठेवा तरच आपला देश महासत्ता होऊ शकेल असे आवाहन एन.एस.डी.सी उपाध्यक्ष नितीन कपूर यांनी यावेळी केले. यावेळी व्यासपिठावर डी वाय पाटील एज्युकेशन सोसायटीच्या सल्लागार सौ पुजा ऋतुराज पाटील, एप्पल एज्युकेशनचे कंट्री हेड हितेश शहा, डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के. प्रथापन, आय.एस. टी. ईचे अध्यक्ष डॉ. प्रतापसिंह देसाई, एथनोटेकचे अध्यक्ष डॉ. किरण राजन्ना, एन.एस.डी.सी चे महाव्यवस्थापक वरूण बात्रा, केंब्रिजचे दक्षिण आशिया संचालक टी के अरुणाचलम, डी. वाय. पाटील ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, कुलसचिव डॉ. जे. ए. खोत, आय.एस. टी. ईचे सचिव के . एस. कुंभार, आय.एस. टी. ईचे एक्झिक्युटिव्ह कौन्सिल मेंबर डॉ. महादेव नरके उपस्थित होते.कुलसचिव डाॅ. जे. ए. खोत यांनी प्रास्ताविक केले. एथनाॅटिकचे अध्यक्ष किरण राजन्ना म्हणाले, दिल्लीसारख्या मोठ्या शहरामध्ये उपलब्ध असलेल्या कौशल्य विकासाच्या योजना आता तळसंदेसारख्या ग्रामीण भागात डी. वाय. पाटील विद्यापिठात उपलब्ध झाल्या आहेत. या ठिकाणी जगभरात नामांकित असलेल्या सात कंपन्याच्यावतीने विद्यार्थ्यांचे भवितव्य घडविण्यात येणार आहे.
Leave a Reply